

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ENG ODI Series : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका संपली आहे. टीम इंडियाने ही मालिका 4-1 ने जिंकली. आता दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने येतील.
भारत आणि इंग्लंड यांच्यात 2 वर्ष 7 महिन्यांनंतर द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील शेवटची एकदिवसीय मालिका जुलै 2022 मध्ये भारतात खेळली गेली होती. तेव्हा टीम इंडियाने 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 2-1 ने जिंकली होती.
भारतीय संघ जवळजवळ 6 महिन्यांनंतर एकदिवसीय सामना खेळणार आहे. यापूर्वी टीम इंडियाने शेवटची वनडे मालिका श्रीलंका दौऱ्यावर खेळली होती. त्या मालिकेत भारताला 0-2 असा पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेने तब्बल 27 वर्षांनी टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत पराभूत केले. आता, टीम इंडिया तो पराभव विसरून इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी वनडे फॉरमॅटमधील ही सर्वात महत्त्वाची मालिका ठरणार आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरू होईल. दुसरा सामना 9 फेब्रुवारी कटकमध्ये तर तिसरा आणि शेवटचा सामना 12 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची असणार आहे कारण टीम इंडियाने जवळजवळ 6 महिन्यांपासून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत, ही 3 सामन्यांची मालिका चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी करण्यासाठी एक चांगली संधी आहे.
पहिला वनडे सामना: 6 फेब्रुवारी : नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
दुसरा वनडे सामना : 9 फेब्रुवारी : कटक (बारबाटी स्टेडियम)
तिसरा वनडे सामना : 12 जानेवारी : अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
टी-20 मालिका गमावल्यानंतर, इंग्लिश संघासाठी भारतीय संघाचा सामना करणे कठीण आव्हान असेल. गेल्या काही वर्षांत, कोणत्याही संघाला भारतीय भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. टीम इंडियाने जवळजवळ 6 वर्षांपासून घरच्या मैदानावर एकही द्विपक्षीय एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. ऑस्ट्रेलियाने 2019 मध्ये भारताला एकदिवसीय मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर टीम इंडियाने पुढील सर्व एकदिवसीय मालिका जिंकल्या असून घरच्या मैदानावर अजिंक्य आहे.