

लंडन: महिला टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारानंतर भारत आणि इंग्लंड महिला संघांमधील क्रिकेटचा रणसंग्राम आता कसोटी क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. आगामी १० जुलै रोजी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडच्या संघाची धुरा अष्टपैलू खेळाडू नॅट सायव्हर-ब्रंट हिच्याकडे सोपवण्यात आली आहे.
सध्या भारतीय महिला संघ आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत व्यस्त असून या स्पर्धेचा अंतिम सामना ५ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या विश्वचषकाची सुरुवात होण्यापूर्वी भारताने इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती. आता विश्वचषक संपल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत, म्हणजेच १० जुलैपासून उभय संघांमध्ये हा ऐतिहासिक कसोटी सामना रंगणार आहे.
क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर आजवर अनेक ऐतिहासिक आणि अटीतटीचे सामने खेळले गेले आहेत. मात्र, लॉर्ड्सच्या प्रदीर्घ इतिहासात पहिल्यांदाच महिला कसोटी सामन्याचे आयोजन केले जात असल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक सामन्यासाठी इंग्लंडने अत्यंत समतोल संघाची निवड केली आहे. संघात १४ कसोटी सामन्यांचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या माजी कर्णधार हिथर नाईट हिचा समावेश करण्यात आला आहे. तिच्या अनुभवाचा इंग्लंडला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, बोर्डाने या महत्त्वाच्या सामन्यासाठी युवा रक्तालाही वाव दिला असून ॲलिस कॅप्सी, टिली कॉर्टिन-कोलमन आणि मॅडी विलियर्स या तीन युवा खेळाडूंना पहिल्यांदाच इंग्लंडच्या कसोटी संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे अंतिम अकरामध्ये स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी हा सामना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अत्यंत संस्मरणीय ठरणार आहे. याशिवाय एमी जोन्स आणि सोफी एक्लेस्टोन या अनुभवी खेळाडू देखील संघाचा मुख्य कणा असतील. दुसरीकडे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या ऐतिहासिक सामन्यासाठी आधीच भारतीय संघाची घोषणा केली असून भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौर हिच्याकडे असणार आहे.
महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना १९८६ मध्ये खेळवला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण १५ कसोटी सामने खेळले गेले आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे दिसते. भारताने या १५ पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे, तर इंग्लंडला केवळ एका सामन्यात यश आले आहे. उर्वरित ११ सामने अनिर्णित (ड्रॉ) सुटले आहेत. या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये शेवटची कसोटी लढत २०२३ च्या अखेरीस खेळवली गेली होती.
नॅट सायव्हर-ब्रंट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, लॉरेन बेल, माया बाउचर, ॲलिस कॅप्सी, टिली कॉर्टिन-कोलमन, सोफी एक्लेस्टोन, लॉरेन फाइलर, एमी जोन्स, हिथर नाईट, एमा लॅम्ब, ग्रेस पॉट्स, एली थ्रेलकेल्ड, मॅडी विलियर्स, इझी वाँग.