

मँचेस्टर : भारतीय संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या इंग्लंड दौऱ्यावर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, चौथ्या कसोटी सामन्यात त्याने इंग्लिश गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावले आहे. या खेळीदरम्यान त्याने एक असा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला आहे, जो यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूला जमलेला नाही.
खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन संघासाठी महत्त्वपूर्ण धावा करण्याची क्षमता आणि अचूक गोलंदाजी, ही रवींद्र जडेजाची ओळख आहे. इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेत त्यांनी आपल्या फलंदाजीने विशेष छाप पाडली आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात जडेजा 65 धावांवर खेळत असताना, त्याने इंग्लंडच्या भूमीवर आपल्या 1000 कसोटी धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे, याच भूमीवर गोलंदाजी करताना त्याने यापूर्वीच 34 बळी घेतले आहेत.
या कामगिरीसह, परदेशी भूमीवर (एकाच देशात) कसोटी क्रिकेटमध्ये 1000 पेक्षा जास्त धावा आणि 30 पेक्षा जास्त बळी घेणारा जड्डू हा पहिलाच भारतीय अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही भारतीय अष्टपैलू खेळाडूला कोणत्याही विदेशी देशात अशी दुहेरी कामगिरी करता आलेली नव्हती.
या संपूर्ण कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा यांनी आपल्या फलंदाजीची जादू दाखवली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये त्याने अनुक्रमे 89 आणि 69 धावा करत अर्धशतके झळकावली होती. त्यानंतर तिसऱ्या कसोटीतही त्याने 72 आणि 61 धावांच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या. आता चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही त्याने शतक पूर्ण केले आहे. या मालिकेत त्याने आतापर्यंत 400 हून अधिक धावा फटकावल्या असून आपल्या फलंदाजीने एक वेगळा ठसा उमटवला आहे.
रवींद्र जडेजाने 2012 साली भारतीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून, विशेषतः भारतीय खेळपट्ट्यांवर, त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. तसेच, कठीण प्रसंगी फलंदाजीनेही संघाला आधार दिला आहे. जडेजाने आतापर्यंत 84 कसोटी सामन्यांमध्ये 3800 हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय, गोलंदाजीत त्यांनी 330 बळी देखील घेतले आहेत, जे त्यांच्या अष्टपैलू क्षमतेची साक्ष देतात.