

लंडन : ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर आजपासून (दि. 10) सुरू होणार्या तिसर्या कसोटी सामन्यात भारत-इंग्लंडचे उभय संघ पुन्हा एकदा आपले सर्वस्व पणाला लावत मालिकेत आघाडी घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकीकडे भन्नाट फॉर्मात असलेले भारतीय फलंदाज कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वासाने उतरतील, तर दुसरीकडे, जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे धारदार झालेली भारतीय गोलंदाजी यजमान इंग्लंडची खरी परीक्षा पाहणार आहे. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 पासून सुरुवात होईल.
पाच सामन्यांची ही कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असली, तरी एजबॅस्टनमध्ये इंग्लंडचा 336 धावांनी धुव्वा उडवल्यानंतर भारताचे पारडे जड मानले जात आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील या तरुण संघाने एजबॅस्टनमध्ये केवळ कडवी झुंजच दिली नाही, तर दोन्ही सामन्यांमध्ये बहुतांश सत्रांवर आपले वर्चस्व गाजवले आहे. तोच कित्ता संघ येथेही गिरवेल, अशी अपेक्षा असणार आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला सहज नमवू, असा इंग्लंडचा होरा होता. मात्र, भारताच्या कामगिरीने त्यांच्या राखीव खेळाडूंची ताकद आणि गुणवत्तेची प्रचिती आणून दिली आहे. गिल आणि कंपनीने उभारलेल्या धावांच्या डोंगरामुळे इंग्लंडला आपली मूळ रणनीती बदलण्यास भाग पडले आहे.
सपाट खेळपट्ट्या तयार करून प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याची त्यांची योजना त्यांच्यावरच उलटली. त्यामुळे आता ‘लॉर्डस्’वर सीम गोलंदाजीला अनुकूल, हिरवीगार खेळपट्टी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातच, ‘लॉर्डस्’च्या मैदानातील विशिष्ट स्लोपचे आव्हान फलंदाजांचा कस पाहणारे ठरेल. मालिकेला आतापर्यंत उत्तम प्रतिसाद लाभत आला असून, लॉर्डस् कसोटीचीही सर्व तिकिटे विकली गेली आहेत. दोन्ही संघांच्या चुरशीच्या खेळामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
फलंदाजीमध्ये करुण नायरचा फॉर्म वगळता भारताला फारशी चिंता नाही. यशस्वी जैस्वालवर आखूड टप्प्याच्या चेंडूंचा मारा करण्याची इंग्लंडची रणनीती असली, तरी तो धावा काढण्याचा मार्ग शोधून काढेल, अशी अपेक्षा आहे. गोलंदाजीत एकमेव बदल निश्चित मानला जात असून, प्रसिद्ध कृष्णाच्या जागी जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन होईल.
लीडस् कसोटीनंतर भारतीय वेगवान गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. परंतु, आता आकाश दीप, मोहम्मद सिराज आणि बुमराह यांच्यामुळे हे आक्रमण अधिक भेदक दिसत आहे. सिराजला 2021 मध्ये लॉर्डस्वर केलेल्या सामना विजयी कामगिरीतून प्रेरणा मिळेल, तर बुमराह कोणत्याही खेळपट्टीवर धोकादायक ठरू शकतो.
मालिका बरोबरीत असली, तरी सर्वोत्तम गोलंदाज भारताचेच आहेत. बुमराह इतरांपेक्षा खूपच सरस आहे. गेल्या कसोटीत आकाश दीप आणि सिराज यांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ती उत्कृष्ट होती. तीन बळी मिळवून देणारे वेगवान गोलंदाज संघात असणे, हा भारतासाठी खूप मोठा फायदा आहे आणि हीच गोष्ट सध्या इंग्लंडसाठी चिंतेची बाब आहे.
- इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉफ
मालिका बरोबरीत असली, तरी सर्वोत्तम गोलंदाज भारताचेच आहेत. बुमराह इतरांपेक्षा खूपच सरस आहे. गेल्या कसोटीत आकाश दीप आणि सिराज यांनी ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ती उत्कृष्ट होती. तीन बळी मिळवून देणारे वेगवान गोलंदाज संघात असणे, हा भारतासाठी खूप मोठा फायदा आहे आणि हीच गोष्ट सध्या इंग्लंडसाठी चिंतेची बाब आहे.
1. कर्णधार म्हणून एका मालिकेत सर्वाधिक धावा
गिल हा कर्णधार म्हणून कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या डॉन ब्रॅडमन यांच्या 88 वर्षे जुन्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. ब्रॅडमन यांनी 1936-37 च्या अॅशेस मालिकेत 90 च्या सरासरीने 3 शतकांसह 810 धावा केल्या होत्या. गिलला हा विक्रम मोडण्यासाठी 225 धावांची गरज आहे.
2. का मालिकेत सर्वाधिक धावा
ब्रॅडमन यांनी 1930 च्या अॅशेस मालिकेत 974 धावा केल्या होत्या, जे कोणत्याही फलंदाजाने एका कसोटी मालिकेत केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी गिलला आणखी 390 धावांची गरज आहे.
3. एका मालिकेत सर्वाधिक शतके
वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाईड वॉलकॉट यांनी 1955 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत पाच शतके झळकावली होती. हा पराक्रम गाठण्यासाठी गिलला आणखी दोन शतकांची गरज आहे आणि अजून तीन कसोटी सामने शिल्लक आहेत.
4. कर्णधार म्हणून सर्वात जलद 1 हजार धावा
ब्रॅडमन यांचा आणखी एक विक्रम गिल मोडू शकतो, तो म्हणजे सर्वात जलद 1 हजार धावा. ब्रॅडमन यांना 1,000 धावा पूर्ण करण्यासाठी 11 डाव लागले होते. त्यांना मागे टाकण्यासाठी गिलला सहा डावांमध्ये 415 धावांची गरज आहे.
5. इंग्लंडविरुद्ध एका मालिकेत सर्वाधिक धावा
यशस्वी जैस्वालच्या नावावर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाजातर्फे सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने 2024 मध्ये मायदेशात झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 89 च्या सरासरीने दोन द्विशतकांच्या मदतीने 712 धावा केल्या होत्या. गिलला हा विक्रम मागे टाकण्यासाठी आणखी 127 धावांची गरज आहे.