IND Vs BAN : रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी?

IND Vs BAN : रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी?

मुंबई, वृत्तसंस्था : भारत विरुद्ध बांगला देश (IND Vs BAN) एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बुधवारी भारताला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला. सामन्यात बांगला देशची फलंदाजी सुरू असताना दुसर्‍या षटकात झेल घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने दिलेल्या माहितीनुसार दुखापतीनंतर रोहित आता मायदेशी परतणार आहे. बांगला देश विरुद्ध मालिकेतील तिसरा सामना हा 10 डिसेंबरला चितगाव येथे होणार आहे. आता या सामन्यात व 14 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या कसोटी मालिकेत रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळण्याची शक्यता आहेे.

14 डिसेंबरपासून (IND Vs BAN) चट्टोग्राम येथे सुरू होणार्‍या बांगला देशविरुद्धच्या आगामी दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळण्याची शक्यता आहे. अभिमन्यू ईश्वरनने सध्या सुरू असलेल्या 'अ' कसोटी मालिकेत एकापाठोपाठ एक शतके झळकावली आहेत तसेच तो सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी करत आहे. अशावेळी त्याला सिल्हेटमधील दुसरा 'अ' कसोटी संपल्यानंतर चट्टोग्रामच्या संघात सामील केले जाऊ शकते.

ईश्वरन रोहितच्या जागी संघात येत असला तरी कसोटी सामन्यात कर्णधार के.एल. राहुल आणि शुभमन गिल हे चट्टोग्राम आणि ढाका येथे भारतासाठी सलामीवीर असतील असेही समजत आहे. तसेच भारत 'अ'साठी सातत्याने उत्तम कामगिरी करणारा बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार किंवा उमरान मलिक दुखापतग्रस्त मोहम्मद शमीची जागा घेऊ शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news