पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगला देशविरूद्धच्या कसाेटी सामन्यात पंत पाठोपाठ शुभमन गिल ( shubman gill ) याने दमदार फलंदाजी करत शतक झळकावले. त्याने 161 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 9 चौकार लगावत 100 धावा केल्या. भारताच्या पहिल्या दोन विकेट लवकर पडल्यानंतर फलंदाजीला आलेल्या गिलने संयमी आणि आक्रमक अशी मिश्र खेळी करत संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारताच्या पहिल्या डावाची सुरूवात खराब झाली. भारतीय संघाने अवघ्या 34 धावांत रोहित, विराट आणि शुभमन असे धुरंधर फलंदाज गमावले. त्यांना बांगला देशचा गोलंदाज हसन महमूदने बाद केले. यानंतर अश्विन (113) आणि जडेजा(86) यांनी उत्तम फलंदाजी करत डावाची धुरा सांभाळत भारताला 378 धावांपर्यंत पोहचवले.
भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगला देशी फलंदाजांना बुमराहने आपल्या वेगवान गोलंदाजीने सळो की पळो केले. त्याने शादमन इस्लाम, मुशफिकुर रहिम, हसन महमुद आणि तस्किन अहमद यांना तंबूत धाडले. अखेर भारतीय गोलंदाजी पुढे बांगला देशचा डाव 149 धावांवर गुंडाळला.
दुसऱ्या डावाच्या सुरूवातीलाच कर्णधार रोहितच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. सामन्याच्या दोन्ही डावांत रोहित स्वस्तात बाद झाला. यानंतर पहिल्या डावात चांगली फलंदाजी केलेला यशस्वी 10 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर विराटही अवघ्या 17 धावा करून बाद झाला. यानंतर शुमभन गिल आणि रिषभने संघाच्या डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागिदारी केली. परंतु, 109 धावांवर खेळणाऱ्या रिषभला बांगला देशचा गोलंदाज मेहंदी हसनने बाद केले. यानंतर गिलने 161 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 9 चौकार लगावत शतक झळकावले.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत शुभमन गिलने विराट कोहलीला मागे टाकले आहे. 2019 मध्ये सुरू झालेल्या WTC मध्ये कोहलीने एकूण 4 शतके झळकावली आहेत. तर गिलने 5 शतके झळकावली आहेत. या बाबतीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भारतीय फलंदाजांमध्ये आघाडीवर आहे. डब्ल्यूटीसीमध्ये त्याच्या नावावर एकूण 9 शतके आहेत. तर ऋषभ पंत 4 शतकांसह विराट कोहलीच्या पाठीशी उभा आहे.
शुभमन गिलने डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात 45 धावा आणि दुसऱ्या डावात 35 धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा गिल कसोटीत सतत संघर्ष करत आहे. पहिल्या कसोटी शतकासाठी त्याला सुमारे 2 वर्षे वाट पाहावी लागली. गिलने डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले.
यानंतर त्याने मार्च २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरे शतक झळकावले. त्यानंतर फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये इंग्लंड कसोटी मालिकेदरम्यान त्याने आणखी 2 शतके झळकावली आणि आता त्याने 5 वे शतक झळकावले आहे. वनडेत ५८ च्या सरासरीने फलंदाजी करणारा गिल कसोटीत सातत्याने मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरला आहे. 25 कसोटी सामन्यांच्या 46 डावांमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी केवळ 35 आहे. शुभमन गिलने आतापर्यंत कसोटीत 5 शतके, एकदिवसीय सामन्यात 6 आणि टी-20 मध्ये एक शतक झळकावले आहे.