

पुढारी ऑनलाईन डेस्क : चौथ्या दिवसाचा खेळ संपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात नऊ गडी गमावून 228 धावा केल्या आहेत. पहिल्या डावाच्या आधारे त्यांच्याकडे 105 धावांची आघाडी होती. अशा स्थितीत संघाची एकूण आघाडी 333 धावांची झाली आहे. स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताला विकेट्सची आस लागली आहे. आतापर्यंत दोघांनी 110 चेंडूत 10व्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली आहे. लियॉन 41 धावांवर नाबाद असून बोलंड 10 धावांवर नाबाद खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला 173 धावांवर नववा धक्का बसला. कांगारूंनी पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव रविवारीच 369 धावांवर संपुष्टार आला.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 2024-25 अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे खेळवली जात आहे. हा सामना 26 डिसेंबरपासून सुरू झाला. आतापर्यंत चार दिवसांचा खेळ पूर्ण झाला आहे. चौथ्या दिवशी (29 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 228 धावा केल्या. स्कॉट बोलँड 65 चेंडूत 10 आणि नॅथन लियॉन 54 चेंडूत 41 धावांवर नाबाद आहेत. आतापर्यंत दोघांमध्ये दहाव्या विकेटसाठी 110 चेंडूत 55 धावांची भागीदारी झाली आहे. यासह ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी 333 धावांची आहे.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला सुरुवातीचे धक्के बसले. एकवेळ 91 धावांपर्यंत संघाचे 6 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. येथून मार्नस लॅबुशेनसह (70) कर्णधार पॅट कमिन्ससह (41)ने डाव सांभाळला. दोघांमध्ये 116 चेंडूत 57 धावांची भागीदारी झाली. लॅबुशेन वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला या डावात अर्धशतक करता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. यामध्ये सॅम कॉन्स्टास (8), ट्रॅव्हिस हेड (1), मिचेल मार्श (0), ॲलेक्स कॅरी (2) आणि मिचेल स्टार्क (5) यांचा समावेश आहे. उस्मान ख्वाजा 21 धावा करून बाद झाला तर स्टीव्ह स्मिथ 13 धावा करून बाद झाला. भारताकडून आतापर्यंत बुमराहने चार आणि सिराजने तीन विकेट्स घेतल्या आहेत. रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली.
लियॉन आणि बोलँडच्या भागीदारीमुळे भारताचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. 110 चेंडू म्हणजेच दोघांनी मिळून सुमारे 18 षटके खेळली. दिवसाच्या शेवटच्या षटकात टीम इंडियालाही संधी मिळाली, पण बुमराहचा तो चेंडू नो बॉल ठरला. बुमराहचा नो बॉल लियॉनच्या बॅटच्या काठाला लागला आणि चेंडू स्लिपमध्ये गेला. राहुलनेही झेल घेतला, पण नो बॉलमुळे लियॉनला जीवदान मिळाले.
आता सोमवारी 98 षटकांचा सामना होणार आहे. सुरुवातीच्या सत्रात टीम इंडिया ऑस्ट्रेलियन इनिंगला रोखू शकते की नाही हे पाहणे बाकी आहे. मेलबर्नमध्ये इतिहास रचण्याची भारताकडे संधी आहे. याआधी मेलबर्न मैदानावर 332 धावांचा यशस्वी पाठलाग झाला आहे. 1928 मध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा पराक्रम केला होता.
लॅबुशेन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 139 चेंडूंचा सामना करत 70 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे 23 वे तर भारताविरुद्धचे सहावे अर्धशतक आहे. लॅबुशेनने पहिल्या डावातही चांगली खेळी केली आणि 145 चेंडूंचा सामना करत 72 धावा केल्या होत्या.
माजी दिग्गज कपिल देव हे सर्वात जलद 200 बळी घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज होते. त्यांनी 1983 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या 50 व्या कसोटी सामन्यात 200वा बळी घेतला होता. बुमराहने कपिल देव यांचा हा मोठा विक्रम मोडला. तो आता सर्वात वेगवान 200 बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. 44व्या कसोटीत त्याने ही कामगिरी केली आहे. सर्वात जलद 200 विकेट्स (33 कसोटी) घेण्याचा विक्रम पाकिस्तानच्या यासिर शाहच्या नावावर आहे.
बुमराहने अशी कामगिरी केली आहे जी आजपर्यंत कोणताही गोलंदाज करू शकलेला नाही. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. बुमराहने ट्रॅव्हिस हेडला बाद करत 200 बळी पूर्ण केले.
जसप्रीत बुमराहसाठी यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा सर्वोत्तम ठरला आहे. संपूर्ण मालिकेत त्याच्या मा-यापुढे यजमान कांगारू फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत. मेलबर्न स्टेडियमवरही बुमराहने आपल्या वेगाने सर्वांना चकीत केले. सामन्याच्या चौथ्या दिवशी बुमराहने कांगारू संघाचा सलामीचा फलंदाज सॅम कोन्स्टासला क्लिन बोल्ड केले. यासह त्याने भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक खास विक्रम मोडला. बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी बुमराहने त्याच्या अप्रतिम इनस्विंग बॉलने कॉन्स्टासला क्लिन बोल्ड केले. यासह तो ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज बनला. बुमराहच्या आधी हा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. त्यांनी 1991-92 मध्ये झालेल्या मालिकेत एकूण 25 विकेट घेतल्या होत्या.