

पुढारी ऑनलाईन डेस्क : Sam Konstas Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीला गुरुवारपासून (दि. 26) सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच दिवशी कांगारूंचा सलामीवीर फलंदाज सॅम कॉन्स्टास आणि भारतीय स्टार खेळाडू विराट कोहली यांच्यात वाद रंगला. ज्याची सर्वाधिक चर्चा झाली. या प्रकरणाची आयसीसीने गंभार दखल घेत कोहलीला मॅच फीच्या 20 टक्के दंड ठोठावला. तसेच त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला.
या सगळ्यामध्ये सॅम कॉन्स्टासने पहिल्या डावात 60 धावा करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आणि 76 वर्ष जुना विक्रम मोडण्यातही यश मिळविले. या सामन्यातून कॉन्स्टासने आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने पहिल्याच सामन्यात त्याने दमदार खेळी केली. सॅमने 65 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 60 धावा केल्या.
यासह तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटी सामन्यात 50+ धावा करणारा दुसरा सर्वात तरुण फलंदाज बनला. त्याने माजी कसोटीपटू नेल हार्वे यांना मागे टाकले. हार्वे यांनी ऑस्ट्रेलियन संघासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये 1948 साली 19 वर्षे आणि 121 दिवसांचे वय असताना पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांनी पहिल्या डावात 50+ धावांची इनिंग खेळली होती. आता सॅमने 19 वर्षे आणि 85 दिवसांचे वय असताना 50+ धावा फटकावल्या आहेत. या यादीत पहिल्या स्थानावर इयान क्रेग आहेत. त्यांनी 1953 मध्ये 17 वर्षे 239 दिवसांचे वय असताना असा पराक्रम केला होता.
17 वर्षे 239 दिवस : इयान क्रेग (1953)
19 वर्षे 085 दिवस : सॅम कॉन्स्टास (2024)
19 वर्षे 121 दिवस : नील हार्वे (1948)
बॉक्सिंग डे टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या टॉप 4 फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. स्टीव्ह स्मिथ 68 धावा करून नाबाद आहे. तर या कसोटी सामन्यात पदार्पण करणारा सलामीवीर सॅम कॉन्स्टासने 65 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 60 धावांची शानदार खेळी केली. उस्मान ख्वाजानेही पहिल्या डावात 6 चौकारांच्या मदतीने 57 धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांमध्ये पहिल्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी झाली.