IND vs AFG : भारताचा सुपर-8 मध्ये विजयी प्रारंभ; अफगाणिस्तानला 47 धावांनी हरवले

IND vs AFG : भारताचा सुपर-8 मध्ये विजयी प्रारंभ; अफगाणिस्तानला 47 धावांनी हरवले
Published on
Updated on

बार्बाडोस, वृत्तसंस्था : अमेरिकेतील प्राथमिक फेरी जिंकून विंडीजमधील सुपर-8 फेरीचा दिमाखात प्रारंभ करताना भारताने आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानवर 47 धावांनी सहज सुंदर विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 181 धावा केल्या. रोहित शर्मा, विराट कोहली व रिषभ पंत ही आघाडीची फळी अपयशी ठरली. अफगाणचा कर्णधार राशिद खान याने 3 महत्त्वाच्या विकेट्स घेऊन भारताला बॅकफूटवर फेकले होते, परंतु सूर्या-हार्दिक जोडीने कमाल करून दाखवली. सूर्यकुमार यादव (53) व हार्दिक पंड्या (32) यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्याने 27 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर हार्दिकनेही चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर सुरु झाला द जसप्रीत बुमराह शो.. बुम बुम बुमराहने अफगाणिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडताना अवघ्या 7 धावात 3 विकेट घेतल्या. यामुळे अफगाणचा डाव 134 धावांत गुंडाळला गेला.

ब्रीजटाऊनच्या संथ खेळपट्टीवर भारताच्या 181 धावांचा पाठलाग करताना अर्शदिपच्या पहिल्या षटकांत रहमानुल्लाह गुरबाझने एक चौकार आणि एक षटकार ठोकून मौज केली. पण चैन जास्त वेळ चालली नाही. पुढच्या षटकांत बुमराहने गुरबाझला (11) बाद केले. खेळपट्टीचे रंग ओळखून रोहितने अक्षर पटेला चौथे षटक सोपवले. इब्राहिम झद्रानचा झेल विराटने सोडला परंतु तो महाग पडणार नाही याची दक्षता अक्षर पटेल आणि रोहित शर्माने घेतली. झद्रान 8 धावांवर बाद झाला. बुमराहने आपल्या दुसर्‍या षटकांत हझरतुल्ला झझाईला (2) जडेजाकडे झेल देण्यास भाग पाडले. यावेळी अफगाणिस्तानची अवस्था 3 बाद 23 झाली होती.

यानंतर गुलबद्दीन नैब आणि आझमतुल्लाह ओमरझाई यांनी पडझड रोखली. अर्धशतकाकडे चाललेली ही भागीदारी कुलदिप यादवने तोडली. त्याने 26 धावा करणार्‍या नैबने पंतकडे झेल दिला. त्याचा जोडीदार जडेजाचा शिकार झाला. ओमरझाईने (26) अक्षर पटेलकडे झेल दिला.

नजीबुल झद्रान बुमराचा तिसरा बळी ठरला. 19 धावांवर त्याने अर्शदिपकडे झेल दिला. मोहम्मद नबीने कुलदिपला षटकार ठोकला. आणि दुसर्‍यांदा तसा प्रयत्न करताना जडेजाकडे झेल दिला. त्याने 14 धावा केल्या. पहिल्या स्पेलमध्ये महागड्या ठरलेल्या अर्शदिपने शेवटच्या तीन विकेट घेतल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर अफगाणिस्तानचा डाव 134 धावांत संपुष्टात आला. भारताच्या जसप्रीत बुमराहने 7 धावांत 3 विकेट घेतल्या. अर्शदिप (3 विकेट) आणि कुलदिप यादव (2) यांनी त्याला चांगली साथ दिली.

बार्बाडोसची खेळपट्टी मंद असल्याचे पाहून भारतीय संघात मोहम्मद सिराज ऐवजी कुलदिप यादवचा समावेश करण्यात आला. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी घेतली परंतु अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान याच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची कोंडी झालेली पाहायला मिळाली. रोहित शर्मा (8) पुन्हा एकदा डावखुर्‍या जलदगती गोलंदाजासमोर अपयशी ठरल्यानंतर राशिदने 3 विकेट्स घेतल्या. ऋषभ पंत (20) , विराट कोहली 24) व शिवम दुबे (10) माघारी परतले.

यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. 15व्या षटकापर्यंत संयमी खेळ करणार्‍या या जोडीने गिअर बदलला. या दोघांनी 37 चेंडूंत 60 धावांची भागीदारी केली. सूर्या 28 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह 53 धावांवर झेलबाद झाला. नवीन उल हकच्या गोलंदाजीवर 18व्या षटकात हार्दिक (32 धावा, 24 चेंडूं, 3 चौकार व 2 षटकार) झेलबाद झाला. त्यापूर्वी तो पायचित बाद दिला गेला होता, परंतु डीआरएसने त्याला वाचवले. याचा फायदा त्याला घेता आला नाही. रवींद्र जडेजा 7 धावांवर बाद झाला आणि फारुकीने 33 धावांत 3 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलने शेवटच्या षटकांत (12) चांगली फटकेबाजी करून संघाला 8 बाद 181 धावांपर्यंत पोहोचवले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news