

IND vs AFG 1st ODI:
धर्मशाळा : आगामी २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकाची पूर्वतयारी म्हणून पाहिल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील ऐतिहासिक पहिल्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेला आज शनिवारपासून (दि. १३) धर्मशाळेत सुरुवात होत आहे. मात्र, या सामन्यावर पावसाचे सावट असून, वादळी वारे आणि गारपिटीच्या इशाऱ्यामुळे चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
भारतीय वेळेनुसार हा सामना आज शनिवारी दुपारी १.३० वाजता सुरू होईल. दरम्यान, हिमाचल प्रदेशमधील हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, संपूर्ण राज्यात १६ जूनपर्यंत हवामान खराब राहण्याची शक्यता आहे. विशेषतः सामन्याच्या आधी म्हणजेच १२ जूनसाठी हवामान विभागाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला होता, ज्यामध्ये राज्याच्या अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला होता.
त्यानंतर १३ ते १६ जून या कालावधीत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सामन्याच्या दिवशी धर्मशाला येथे हलक्या पावसाची जवळपास ५५ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येथील तापमान १२ ते १८ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज असल्याने खेळाडूंना कडाक्याच्या थंडीचाही सामना करावा लागेल. सामना सुरू असताना पाऊस आल्यास डकवर्थ-लुईस नियमाचा आधार घ्यावा लागू शकतो.
या सामन्यात विराट कोहली, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांसारख्या प्रमुख वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या शक्तीची आणि युवा खेळाडूंची मोठी परीक्षा असणार आहे. नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत पराभव पत्करावा लागल्यामुळे भारतीय संघ पुन्हा फॉर्मात येण्यासाठी उत्सुक असेल.
भारत:
रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव.
अफगाणिस्तान:
रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, सिद्दीकुल्लाह अटल, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह, इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), अझमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेयालिया खरोटी, ए. एम. गझनफर, बिलाल सामी, दरविश रसुली, फरीद अहमद मलिक, झिया उर रहमान शरिफी.