

महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या १३व्या रोमांचक लढतीत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा ३ गडी राखून पराभव केला. हा ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील तिसरा विजय तर भारतीय संघाचा दुसरा पराभव आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 330 धावा केल्या आणि सर्व गडी गमावले. या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार ॲलिसा हिली हिने 142 धावांची अप्रतिम शतकी खेळी केली. तिच्या याच खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 7 गडी गमावून हे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण केले.
टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला स्मृती मानधना (८०) आणि प्रतिका रावळ (७५) यांनी १५५ धावांची दमदार सलामीची भागीदारी करून मजबूत पाया रचला.
त्यानंतर हरलीन देओल (३८), जेमिमाह रॉड्रिग्स (३३) आणि रिचा घोष (३२) यांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर भारतीय संघाने आपली धावसंख्या ३३० धावांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आणि ऑस्ट्रेलियासमोर एक विशाल लक्ष्य ठेवले.
भारतीय संघाच्या ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाची कर्णधार ऍलिसा हिली हिने १४२ धावांची अविस्मरणीय शतकी खेळी करत सामन्याचे चित्र बदलले.
हिलीच्या धडाकेबाज खेळीला फोएब लिचफील्ड (४०) आणि ऍश्ले गार्डनर (४५) यांनी उपयुक्त साथ दिली. त्यानंतर, एलिस पेरीने (नाबाद ४७) शेवटपर्यंत किल्ला लढवत ऑस्ट्रेलियाला ४८.६ षटकांत ७ गडी गमावून लक्ष्याचा वेध घेण्यास मदत केली. यामुळे ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून आपला थरारक विजय निश्चित केला.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिली हिने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत १०७ चेंडूंमध्ये २१ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांसह १४२ धावांची तुफानी खेळी साकारली. हे शतक तिच्या एकदिवसीय (वनडे) कारकिर्दीतील सहावे आणि भारताविरुद्धचे दुसरे शतक ठरले. विशेष म्हणजे, वनडे विश्वचषकात हिलीचे हे तिसरे शतक आहे.
या तिसऱ्या विश्वचषक शतकासह एलिसा हिली आता ऑस्ट्रेलियासाठी महिला वनडे विश्वचषकात संयुक्तपणे सर्वाधिक शतके झळकावणारी खेळाडू ठरली आहे. तिने या विक्रमात कॅरेन रोल्टन आणि मेग लॅनिंग यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
अमनजोत कौर हिच्या गोलंदाजीवर मॉलाइनक्स पायचीत बाद झाली. पंचांनी बाद दिल्यावर मॉलाइनक्स समाधानाने पॅव्हेलियनकडे चालू लागली. पण पेरीने धावत येऊन तिला Review घेण्यास सांगितले.
ऑस्ट्रेलियाने Review घेतला तरी, हा निर्णय बदलण्याची शक्यता कमी दिसत होती. मधल्या यष्टीवर गुड लेंथवर टाकलेला हा चेंडू अतिशय वेगाने आला आणि खालीच राहिला आणि पॅडवर आदळला. ती बॅकफूटवर जाऊन पुल शॉट खेळू पाहत होती, पण चेंडू चुकला आणि थेट मधल्या यष्टीवर आदळला. यासह कौरने सलग दोन चेंडूंवर दोन बळी घेतले. मॉलाइनक्सने 19 चेंडूत 18 धावा केल्या. यात 2 चौकारांचा समावेश होता.
अमनजोत कौर हिच्या गोलंदाजीवर गार्डनर त्रिफळाचीत झाली. चेंडू मागच्या पायाला लागून थेट मधल्या यष्टीवर आदळला. चेंडू उलट्या दिशेने किंचित आत वळला असावा. चांगल्या लांबीवर टाकलेला हा चेंडू थेट मध्यभागी वळला. गार्डनरने तो फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण बॅटची जाडसर आतील किनार लागून चेंडू मागच्या पायाला आदळला आणि तिथून यष्ट्या उखडल्या गेल्या. एका क्षणी सामना निसटत असतानाही, भारतीय संघाने स्वतःला कसेतरी तरंगते ठेवण्यात यश मिळवले आहे. गार्डनरने 46 चेंडू 3 चौकार 1 षटकारासर 45 धावा फटकावल्या.
दीप्ती शर्मा हिच्या गोलंदाजीवर मॅकग्रा पायचीत अडकली. उत्कृष्ट पुनरावलोकन आणि भारतीय संघ आनंदाने उसळू लागला. पंचांचा निर्णय उलटवला गेल्याने भारताला हा अत्यंत महत्त्वाचा बळी मिळाला. दीप्ती शर्माने हा चेंडू हवेत फिरवत ऑफ-स्टम्पवर चांगल्या लांबीवर टाकला, जो आत वळला. मॅकग्रा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना पूर्णपणे चुकली आणि चेंडू तिच्या पॅडवर आदळला.
पंचांनी सुरुवातीला नाबाद दिले होते. परंतु, भारताने Review घेतला. टीव्ही रिप्लेमध्ये चेंडूचा इम्पॅक्ट सरळ रेषेत असल्याचे दिसले आणि बॉल-ट्रॅकिंगवर तीन लाल रंगाचे सिग्नल झळकले. उंचीची कोणतीही समस्या नव्हती. भारताचे पुनरावलोकन यशस्वी झाले. मॅकग्राने 8 चेंडूत 12 धावा केल्या. ज्यात 3 चौकारांचा समावेश होता.
श्रीचरणी गोलंदाजीवर हिली बाद झाली. स्नेह राणाने चित्तथरारक झेल घेतला. यासह ऑस्ट्रेलियाची कर्णधार हिलीची वादळी खेळी अखेर संपुष्टात आली. पॅव्हेलियनमध्ये परतताना हिलीने गार्डनरशी संवाद साधला. हा झेल योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. पहिल्या रिप्लेमध्ये चेंडू जमिनीला लागलेला दिसल्याने तिसऱ्या पंचांनी इतर अँगल्सने तपासणी केली. त्यांनी अतिशय हळूवार आणि फ्रेम बाय फ्रेम रिप्ले पाहिला. अखेरीस, चेंडू हाताच पकडल्याचे स्पष्ट दिसत असल्याने त्यांनी हा झेल वैध ठरवला आणि भारताला बहुप्रतिक्षित बळी मिळाला.
श्री चरणने चेंडू ऑफ स्टम्पवर पूर्णपणे हवेत टाकला. हिलीने पुढे सरसावत ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न केला, पण तिने तो स्लाइस केला. स्नेह राणा क्षणाचाही विलंब न लावता पुढे झेपावली आणि एका हाताने चेंडू उचलून दुसऱ्या हाताने तो संतुलित केला. चेंडू जमिनीला लागण्यापूर्वीच तिने तो अचूकपणे टिपला. हिलीने 107 चेंडूत 21 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 142 धावा फटकावल्या. या निर्णायक क्षणामुळे सामन्याला मोठे वळण मिळाले आहे.
एलिसा हिलीने तिच्या कारकिर्दीतील सहावे शतक पूर्ण केले. ती उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या २०० च्या पुढे गेली आहे.
श्रीचरणी हिच्या गोलंदाजीवर सदरलँड त्रिफळाचीत झाली. यासह भारताचे सामन्यात धमाकेदार पुनरागमन झाले. कर्णधार हरमनप्रीत आपल्या संघाला प्रेरित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. श्री चरणीने टाकलेला हा चेंडू अत्यंत भेदक होता. चेंडू मध्यभागी चांगल्या लांबीवर येऊन आत वळला. सदरलँड पुढे सरसावली, पण त्यानंतर चेंडू वेगळ्या दिशेने फिरला आणि बॅटला चकवा देत आणि हुलकावणी देऊन थेट मध्यभागी असलेल्या यष्टीवर आदळला. सदरलँडला चेंडूच्या फ्लाईटने आणि टप्पा यामुळे पूर्णपणे गोंधळात टाकले. हा अविश्वसनीय चेंडू होता आणि भारताने झटपट दोन महत्त्वपूर्ण बळी मिळवले. सदरलँड 2 चेडू खेळून माघारी परतली.
दीप्ती शर्मा हिच्या गोलंदाजीवर मुनी बाद झाली. रॉड्रिग्सने अप्रतिम झेल घेतला. एक़्स्ट्रा कव्हरला डाव्या बाजूला झेपावत घेतलेला हा उत्कृष्ट झेल पाहून जेमिमाह अक्षरशः उत्साहाने भारावून गेली. ऑस्ट्रेलियाची धोकादायक फलंदाज मुनी लवकरच माघारी परतली. मुनीने पुढे सरसावत हा चेंडू खाली न ठेवता मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू वेगाने जात होता, परंतु त्याचवेळी जेमिमाहने डाव्या बाजूला सूर मारून दोन्ही हातांनी तो सुंदर झेल टिपला. भारतीय खेळाडूंनी त्वरित तिच्याभोवती जमा होऊन आनंद व्यक्त केला. मुनीने 8 चेंडूत 4 धावा केल्या.
अॅलिसा हिलीने भारताविरुद्ध ३५ चेंडूत तिचे अर्धशतक पूर्ण केले. तिने तिच्या डावात आठ चौकार आणि एक षटकार मारला.
ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट ऑस्ट्रेलियाने ८५ धावांवर पहिली विकेट गमावली. लिचफिल्ड ४० धावांवर बाद झाला. स्नेह राणाने एक शानदार झेल घेतला. श्रीने भारताला यश मिळवून दिले.
भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे लक्ष्य ठेवले. अॅलिसा हिलीने टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रतिका रावल (७५) आणि स्मृती मानधना (८०) यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली, त्यांनी १५५ धावांची सलामी भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४८.५ षटकांत १० बाद ३३० धावांपर्यंत मजल मारली. पाहुण्या संघाकडून अॅनाबेल सदरलँडने पाच, तर सोफी मोलिनेक्सने तीन बळी घेतले. मेगन शट आणि अॅशले गार्डनरने प्रत्येकी एक बळी घेतला.
भारतीय संघाने शेवटच्या १० षटकांत पाच विकेट गमावल्या. दीप्ती शर्मा एका धावेवर आणि अमनजोत १६ धावांवर बाद झाली.
४५ व्या षटकात भारताचा सहावा विकेट गेला. जेमिमा रॉड्रिग्ज २१ चेंडूत ३३ धावा करून बाद झाली.
भारताची स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोष २२ चेंडूत ३२ धावा करून बाद झाली. यासह भारताने पाचवी विकेट गमावली. रिचाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार खेळी केली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही तिने झटपट धावा जमवल्या.
भारताला तिसरा आणि चौथा धक्का अनुक्रमे हरमनप्रीत कौर आणि हरलीन देओलच्या रूपात बसला. कर्णधार हरमनने १७ चेंडूत २२, तर हरलीनने ४२ चेंडूत ३८ धावा केल्या.
अॅनाबेल सदरलँडने भारताला दुसरा धक्का दिला, त्याने प्रतिका रावलला बाद केले. ७५ धावांच्या दमदार खेळीनंतर ती पॅव्हेलियनमध्ये परतली. कर्णधार हरमनप्रीत कौर आता हरलीन देओलसोबत सामील झाली आहे.
सोफी मोलिनेक्सने भारताला पहिला धक्का दिला. तिने भारताची धावसंख्या १५५ असताना स्मृती मानधनाला फोबी लिचफिल्ड करवी झेलबाद केले. ६६ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ८० धावा काढून मानधना बाद झाली.
मानधना नंतर, प्रतीका रावलनेही अर्धशतक झळकावले. तिने केवळ ७० चेंडूत तिचे सातवे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले.
भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महिला विश्वचषक सामन्यात अर्धशतक झळकावले. मानधनाने ४६ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची दमदार सुरुवात झाली. सलामीवीर स्मृती मानधना-प्रतीका रावलने वर्चस्व राखले. दोघींनी चौफेर फटकेबाजी करून १७ षटकात बिनबाद ९० धावा जोडल्या.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना भारताने चांगली सुरुवात केली. स्मृती मानधना आणि प्रतीका रावल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. भारताने ९व्या षटकात ५० धावा पूर्ण केल्या. यावेळी मानधना ३० आणि रावल २६ धावांवर खेळत होत्या.
भारताच्या डावाला प्रारंभ झाला आहे. सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मानधना फलंदाजीसाठी मैदानात उतरल्या आहेत.
भारत : प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), अमनजोत कौर, स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी.
ऑस्ट्रेलिया : एलिसा हिली (यष्टिरक्षक/कर्णधार), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ॲनाबेल सदरलँड, ॲश्ले गार्डनर, ताहलिया मॅक्ग्रा, सोफी मॉलिन्यूक्स, किम गार्थ, अलाना किंग, मेगन शट.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल.