

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC Test Ranking : आयसीसीने बुधवारी नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली. यात भारतीय संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माने मोठी प्रगती केली आहे. त्याने कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये एन्ट्री घेतली आहे. त्याच्याशिवाय भारतीय संघाचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनाही फायदा झाला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने तब्बल 3 वर्षांनंतर आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये स्थान मिळवले आहे. त्याला फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाचा फायदा झाला असून तो सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. सप्टेंबर 2021 नंतर प्रथमच रोहित शर्मा आयसीसी कसोटी फलंदाजी क्रमवारीत टॉप-5 मध्ये पोहोचला आहे. रोहित शानदार फॉर्ममध्ये आहे जर बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत हिटमॅनच्या बॅटमधून धावा बरसल्या तर तो क्रमवारीत आणखी मोठी झेप घेऊ शकतो.
हिटमॅन व्यतिरिक्त किंग कोहली कोहलीनेही कसोटी फलंदाजीच्या क्रमवारीत प्रगती केली आहे. त्याला एका स्थानाचा फायदा झाला असून तो सातव्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या बरोबर युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाललाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्याने 6 वे स्थान गाठले आहे. अशाप्रकारे टॉप-10 मध्ये भारताच्या तीन खेळाडूंनी धमाकेदार एन्ट्री घेतली आहे.
जो रूट (इंग्लंड) : 899 रेटींग
केन विल्यमसन (न्यूझीलंड) : 859 रेटींग
डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) : 768 रेटींग
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) : 757 रेटींग
रोहित शर्मा (भारत) : 751 रेटींग
यशस्वी जैस्वाल (भारत) : 740 रेटींग
विराट कोहली (भारत) : 737 रेटींग
उस्मान ख्वाज (ऑस्ट्रेलिया) : 728 रेटींग
मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) : 720 रेटींग
मार्नस लॅबुशेन (ऑस्ट्रेलिया) : 720 रेटींग
ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत श्रीलंकेच्या अनेक खेळाडूंनी मोठे यश संपादन केले आहे. ओव्हल येथे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी विजयानंतर श्रीलंकेच्या सहा खेळाडूंनी ताज्या आयसीसी पुरुषांच्या कसोटी क्रमवारीत नवीन कारकीर्दीतील उच्च रँकिंग गाठले आहे.
श्रीलंकेने नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना जिंकला. तब्बल 10 वर्षांनी त्यांनी इंग्लंडच्या धर्तीवर यजमान संघाचा पराभव केला. श्रीलंकेच्या या विजयात त्यांच्या संघाचा कर्णधार धनंजय डी सिल्वा, मधल्या फळीतील फलंदाज कामिंडू मेंडिस आणि सलामीवीर पथुम निसांका या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेचा सर्वाधिक धावा करणाऱ्या डी सिल्वाने 69 धावा केल्या, ज्यामुळे उजव्या हाताच्या फलंदाजाला त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवण्यात मदत झाली. तो कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत 13 व्या स्थानावर पोहोचला. मेंडिस आणि निसांकाने कसोटी फलंदाजांच्या यादीत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट मानांकन मिळवले आहे. निसांकाने इंग्लंडविरुद्धच्या अर्धशतकानंतर सहा स्थानांनी झेप घेतली असून 19व्या स्थानावर पोहचला आहे, तर निसांकाने 42 स्थानांची मोठी झेप घेतली. त्याने 39 वे स्थान गाठले आहे.
इंग्लंडचा जो रूट कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या तिस-या कसोटीत तो अपयशी ठरला. ज्यामुळे त्याचे रेटिंग 922 गुणांवरून 899 पर्यंत घसरले.