ICC T20 WC : सुपर 8 फेरीत इंग्लंडचा पहिला विजय; वेस्ट इंडिज पराभूत

ICC T20 WC : सुपर 8 फेरीत इंग्लंडचा पहिला विजय; वेस्ट इंडिज पराभूत

पुढारी ऑनलाीन डेस्क : आज (दि.20) सकाळी झालेल्या सुपर 8 फेरीतील सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजवर 8 गडी राखून विजय मिळवला. सेंट लुसिया येथील डॅरेन सेमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजचा पराभव करत उपांत्य फेरीतील आपला दावा मजबूत केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिज संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने 17.3 षटकांत 2 बाद 181 धावा केल्या आणि सामना आठ विकेट्स राखून जिंकला.

सॉल्ट आणि बेअरस्टोची दमदार खेळी

181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने डावाची दमदार सुरुवात केली. फिल सॉल्ट आणि जॉस बटलर यांच्यात पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी झाली. रोस्टन चेसने आठव्या षटकात बटलरला एलबीडब्ल्यू आऊट केले. 22 चेंडूत 25 धावा करून तो बाद झाला. मोईन अलीच्या रूपाने संघाला दुसरा धक्का बसला. 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रसेलने जॉन्सन चार्ल्सकरवी झेलबाद केले. त्याला केवळ 13 धावा करता आल्या. यानंतर जॉनी बेअरस्टोने पदभार स्वीकारला. त्याने फिल सॉल्टसोबत तिसऱ्या विकेटसाठी 97 धावांची नाबाद भागीदारी केली.

डावाच्या 16व्या षटकात सॉल्टने रोमॅरियो शेफर्डला लक्ष्य करत त्याच्या षटकात चौकार आणि षटकारांचा वर्षाव करत 30 धावा कुटल्या. या सामन्यात सॉल्ट 87 धावांवर नाबाद राहिला तर बेअरस्टो 48 धावांवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून फक्त रसेल आणि चेस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावलेल्या वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 181 धावा केल्या. फलंदाजीमध्ये ब्रेंडन किंग आणि जॉन्सन चार्ल्स यांनी दमदार सुरुवात करून दिली. मात्र, पाचव्या षटकात मांडीच्या दुखापतीमुळे किंग निवृत्त झाला. तो 13 चेंडूत 23 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर निकोलस पुरन यांने धुरा स्वीकारली. त्याने चार्ल्ससोबत पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली जी मोईन अलीने 12व्या षटकात फोडली. त्याने चार्ल्सला बाद केले. सलामीवीर चार्ल्स 34 चेंडूत 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोव्हमन पॉवेलने शानदार फलंदाजी केली. त्याने पूरनसोबत दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. लियाम लिव्हिंगस्टोनने 15 व्या षटकात पॉवेलला बाद केले. तो 36 धावा करण्यात यशस्वी झाला. त्याचवेळी पुरणने चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 36 धावा काढल्या.

सामन्यात रसेलला एकच धाव करता आली. तर, रदरफोर्ड २८ धावांवर नाबाद राहिला आणि रोमॅरियो शेफर्ड पाच धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मोईन अली आणि लिव्हिंगस्टोन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news