ICC T20 Rankings : आयसीसी टी-20 क्रमवारीत मोठा बदल! ‘या’ खेळाडूंनी बदलले पॉईंट टेबल

ICC T20 Rankings : आयसीसी टी-20 क्रमवारीत मोठा बदल! ‘या’ खेळाडूंनी बदलले पॉईंट टेबल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20I Rankings : टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान आयसीसीने पुन्हा एकदा नवीन टी20 क्रमवारी जाहीर केली आहे. यावेळी त्यात बरेच बदल पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूंनी धावा केल्या नाहीत त्यांना फटका बसला आहे, तर ज्या फलंदाजांनी चांगला खेळ केला आहे त्यांनी मोठी झेप घेतली आहे. मात्र, टॉप 3 मध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि भारताच्या सूर्यकुमार यादवचे अव्वल स्थान कायम आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत भारताचा सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग सध्या 837 आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट 771 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे रेटिंग आता 755 आहे. पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 746 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे. विशेष बाब म्हणजे या दोन्ही खेळाडूंसाठी आता टी-20 विश्वचषक संपला आहे, कारण त्यांचा संघ पाकिस्तान पहिल्याच साखळी फेरीतून बाहेर पडला आहे.

ट्रॅव्हिस हेडची मोठी झेप

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने टी-20 विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याचा त्याला फायदा झाला आहे. त्याने एकाच वेळी पाच स्थानांनी झेप घेतली असून तो आता थेट पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. त्याचे रेटिंग सध्या 742 आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (710) एका स्थानाने घसरून सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

यशस्वी जैस्वालची घसरण

भारताच्या यशस्वी जैस्वाललाही एका स्थानाने फटका बसला आहे. तो 693 च्या रेटिंगसह 7 व्या क्रमांकावर गेला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम 674 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजच्या ब्रेंडन किंगला दोन स्थानांचा फटका बसला असून तो 668 रेटिंगसह नवव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा रीझा हेंड्रिक्स 661 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनने आठ स्थानांनी झेप घेतली आहे. तो 644 च्या रेटिंगसह 11 व्या क्रमांकावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.

मार्कस स्टाइनिस अव्वल अष्टपैलू

टी-20 विश्वचषकादरम्यान आयसीसीने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टाइनिस हा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याचे रेटिंग 231 आहे. त्याने आपल्या संघ ऑस्ट्रेलियासाठी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मागील क्रमवारीत त्याने एका स्थानाने झेप घेतली होती. या यादीत श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाचे दुस-या स्थानी आहे. त्याचे रेटिंग 222 झाले असून त्याने एका स्थानाने झेप घेतली आहे. बांगलादेशचा शाकिब अल हसन दोन स्थानांची झेप घेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 218 आहे.

मोहम्मद नबीचे नुकसान

दरम्यान, गेल्या आठवड्यात अव्वल ठरलेला अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आता खाली आला आहे. पहिल्या क्रमांकावरून तो थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग 213 आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझालाही एक स्थान गमवावे लागले आहे. तो आता 210 च्या रेटिंगसह 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताच्या हार्दिक पंड्यालाही फायदा

नेपाळच्या दीपेंद्र सिंगनेही तीन स्थानांची झेप घेतली आहे. तो आता 199 च्या रेटिंगसह 6 व्या क्रमांकावर आला आहे. भारताच्या हार्दिक पंड्याला एका स्थानाचा फायदा झाला असून तो 8 वरून 7 व्या स्थानावर गेला आहे. त्याचे रेटिंग 192 आहे. इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टन आणि मोईन अली यांना दोन-दोन स्थानांचे नुकसान झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम 175 रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर कायम आहे. आगामी काळात या क्रमवारीत आणखी बदल पाहायला मिळू शकतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news