ICC Rankings : इशान किशनमुळे अभिषेक शर्माचे स्थान धोक्यात, टॉप 10 फलंदाजांमध्ये चुरस

तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवचे स्थान स्थिर
ICC Rankings : इशान किशनमुळे  अभिषेक शर्माचे स्थान धोक्यात, टॉप 10 फलंदाजांमध्ये चुरस
Published on
Updated on

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) टी-२० फलंदाजांची ताजी क्रमवारी जाहीर केली असून, यामध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माने आपले पहिले स्थान कायम राखले असून, यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. गेल्या काही दिवसांत मोजक्याच आंतरराष्ट्रीय टी-२० लढती झाल्यामुळे क्रमवारीत मोठे फेरबदल झाले नसले तरी, खालच्या क्रमांकावर काही नव्या खेळाडूंनी पहिल्या दहामध्ये शिरकाव केला आहे.

अभिषेक अव्वल, इशान किशनकडून कडवे आव्हान

भारतीय युवा फलंदाज अभिषेक शर्मा सध्या ८७५ रेटिंगसह जगातील पहिल्या क्रमांकाचा टी-२० फलंदाज ठरला आहे. मात्र, त्याच्या अव्वल स्थानाला आता इशान किशनकडून तगडे आव्हान मिळत आहे. इशान किशन ८७१ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून, अभिषेक आणि इशान यांच्यात आता केवळ ४ गुणांचे अंतर उरले आहे. सध्या भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळत नसल्यामुळे या क्रमवारीत तूर्तास स्थिरता आहे, परंतु आगामी मालिकांमध्ये या दोघांमधील अव्वल स्थानासाठीची स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवचे स्थान स्थिर

इतर फलंदाजांचा विचार करता, पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान ८४८ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा फिल सॉल्ट (७९२ गुण) चौथ्या, तर श्रीलंकेचा पथुम निसंका (७६६ गुण) पाचव्या स्थानी आहे. भारताचा मधल्या फळीतील आश्वासक फलंदाज तिलक वर्मा (७४२ रेटिंग) सहाव्या तर कर्णधार सूर्यकुमार यादव (७२२) सातव्या स्थानी कायम आहे. इंग्लंडचा जोस बटलर ७१६ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.

डेवाल्ड ब्रेविस आणि ब्रायन बेनेटचा पहिल्या दहामध्ये प्रवेश

क्रमवारीत खालच्या बाजूला काही महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत. द. आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसने एका स्थानाची प्रगती करत (७०२) नववे स्थान पटकावले आहे. झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटही चमकदार कामगिरीच्या जोरावर (७०१) दहाव्या स्थानी पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड (७००) ११ व्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडच्या टिम सायफर्टला या क्रमवारीत मोठा फटका बसला असून त्याची तीन स्थानांनी घसरण झाली आहे. सायफर्ट आता (६९८) १२ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. सायफर्टच्या या घसरणीमुळेच ब्रेविस आणि बेनेट यांना पहिल्या दहामध्ये स्थान मिळवणे सोपे झाले आहे. येणाऱ्या काळात विविध देशांमधील द्विपक्षीय मालिकांमुळे या क्रमवारीत पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news