

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tilak Varma ICC Ranking : टीम इंडियाला मंगळवारी (दि. 28) तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आज (दि. 29) आयसीसीची ताजी क्रमवारी समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचा स्टार फलंदाज तिलक वर्माची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादवची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. ज्यामुळे तिलकने आयसीसी टी-20 फलंदाज क्रमवारीत प्रथमच सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे.
तिलक वर्मा टी-20 क्रिकेटमध्ये सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावून टीम इंडियाला विजयाकडे नेले. यापूर्वी, त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सलग दोन शतके झळकावली होती. आता त्याने पहिल्यांदाच आयसीसी रँकिंगमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. तिलकचे रेटिंग 832 झाले आहे. याआधी तो तिसऱ्या क्रमांकावर होती.
याशिवाय ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेड पहिल्या स्थानावर कायम आहे. हेडचे सध्याचे रेटिंग 855 आहे. इंग्लंडचा फिल साल्ट 782 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंडविरुद्ध मालिकेत भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव फलंदाजीत अपयशी ठरला आहे. परिणामी आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत त्याचे रेटिंग 763 झाले असून तो चौथ्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडचा जो रूट पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या पाठोपाठ सहाव्या क्रमांकावर पाकिस्तानचा बाबर आझम आणि सातव्या क्रमांकावर श्रीलंकेचा पथुम निस्सांका आहे.
पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान टी20 सामना न खेळताही एक स्थान पुढे सरकला आहे. तर भारताचा यशस्वी जैस्वालची न खेळता एका स्थानाने घसरण झाली आहे. रिझवानचे रेटिंग 704 असून तो 8 व्या क्रमांकावर आहे. तर जैस्वाल रेटिंग 685 आहे. तो 9 व्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेचा कुसल परेरा 675 रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहे.
संजू सॅमसनला 12 स्थानांचे नुकसान झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या 3 टी20 सामन्यांमधील खराब कामगिरीमुळे तो 17 व्या स्थानावरून 29 व्या स्थानावर घसरला आहे.