

Bangladesh Cricket Vs ICC: अखेर आयसीसीने बांगलादेशचा ताठपणा मोडून काढला असून आयसीसीने बांगलादेशच्या ऐवजी आता स्कॉटलँड भारतात होणाऱ्या टी २० वर्ल्डकप स्पर्धेत खेळेल असं अधिकृतरित्या जाहीर करून टाकलं. आयसीसीने बांगलादेशला पत्र पाठवून याची माहिती दिली आहे.
आता बांगलादेश भारतात होणाऱ्या टी २० स्पर्धेतून बाहेर गेल्यावर स्कॉटलँडची टीम त्यांची जागा घेणार आहे. स्कॉटलँड ग्रुप C मध्ये सामील असणार आहे. त्यांचे सामने हे इंग्लंड, वेस्ट इंडीज, नेपाळ आणि इटली या संघांसोबत होणार आहेत.
बांगलादेश आणि आयसीसी यांच्यात जवळपास तीन आठवडे यावरून संघर्ष सुरू होता. बांगलादेश त्यांचे सामने भारतातून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची मागणी करत होते. आयसीसीने आता सामने हलवणे शक्य नाही अशी रास्त भूमिका घेतली होती. आयसीसीने बांगलादेशला तुम्हाला भारतातच खेळावे लागेल असं ठणकावलं होतं.
यानंतर देखील बांगलादेशने आपला हेका सोडला नाही. अखेर आयसीसीमध्ये या विषयावर मतदान झालं. त्यात १४ विरूद्ध २ अशा मतफरकाने बांगलादेशचा पराभव झाला. विशेष म्हणजे एका स्वतंत्र समितीने भारतातील सुरक्षेची तपासणी केली होती त्यावेळी बांगलादेशच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना भारतात कमी ते मध्यम स्वरूपाचा धोका असल्याचा अहवाल आला होता.