

Bangladesh T20WC Row: बांगलादेश सरकारनं भारतात टी २० वर्ल्डकपचे सामने न खेळण्याचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान, आयसीसीने बांगलादेशची त्यांचे सामने इतर ठिकाणी शिफ्ट करण्याची मागणी धुडकावून लावली. त्यानंतर त्यांना अल्टीमेटम देण्यात आला होता. मात्र पाकिस्तानच्या नादाला लागून स्वतःचं नुकसान करून घेण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला. आयसीसीने देखील स्कॉटलँडला टी २० वर्ल्डकप खेळण्याची संधी देत बांगलादेशला चांगलीच अद्दल घडवली.
दरम्यान, या सर्व घडामोडीत सर्वात जास्त कोणाचं नुकसान झालं असेल तर ते बांगलादेशच्या क्रिकेटपटूंचे... बांगलादेशचा निर्णय जाहीर करणाऱ्या बांगलादेश क्रीडा सल्लागार असिफ नजरूल यांना जे खेळाडू सतत खेळाडूंचे नुकसान होणार नाही असा निर्णय घ्या अशी विनंती करत होते त्याबाबत विचारणा करण्यात आली.
नजरूल यांनी खेळाडू नमके काय म्हणाले हे गुलदस्त्यातच ठेवलं. त्यांनी सरकारच्या निर्णयानंतर खेळाडून नेमके काय म्हणाले हे सांगितलं नाही. मात्र त्यांनी खेळाडूंनी परिस्थीती समजून घ्यावी अशी प्रतिक्रिया दिली.
नजरूल म्हणाले, 'आम्ही परिस्थिती समजून सांगण्यासाठी खेळाडूंची भेट घेतली. आम्ही सरकारनं हा निर्णय का घेतला याचं कारण देखील सांगितलं. हे एक बंद दाराआडचं संभाषण असल्यानं च्याची खोलात जाऊन माहिती देऊ शकत नाही. त्याचबरोबर खेळाडूंना देखील याबाबतचा तपशील उघड करू नका असे सांगण्यात आले आहे. मात्र त्यांनी परिस्थिती समजून घेतली असेल असं वाटतं.'
नजरूल म्हणाले, 'बांगलादेश हा मोठी लोकसंख्या असलेला देश आहे. या देशात क्रिकेटचे जवळपास २० कोटी चाहते आहेत. जर आयसीसी आम्हाला सामावून घेऊ शकत नसेल तर हा जागतिक क्रिकेटचा आणि स्पर्धा आयोजित करणाऱ्या देशाचा मोठा लॉस आहे.'
दरम्यान, बांगलादेशचा माजी कर्णधार तमिम इक्बाल आणि सध्याचा कसोटी कर्णधार नजमुल हुसैन शांतो हे खेळाडूंच्या हिताचे आणि प्राधान्याचा विचार केला जावा अशी आग्रही मागणी केली होती. यानंतर इक्बालवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून भारताचा हस्तक म्हणून देखील टीका करण्यात आली. इक्बालने बांगलादेशने कोणतीही कडक भूमिका घेऊ नये असं वक्तव्य केलं होतं.
सध्याच्या परिस्थितीत सर्वात जास्त नुकसान हे खेळाडूंचे झाले आहे. बीसीबी नजमुल इस्लाम यांनी खेळाडूंनी आयसीसी स्पर्धांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसल्यामुळं त्यांना कोणताही नुकसान भरपाई मिळणार नाही असं ठणकावलं होतं. मात्र यानंतर खेळाडूंनी आगपाखड केल्यावर इस्लाम यांना बीसीबीच्या अर्थिक समितीचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं होतं.