

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी एकदिवसीय खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. अफगाणिस्तानचा अझमतुल्लाह उमरझाई हा नंबर-1 एकदिवसीय अष्टपैलू खेळाडू बनला आहे. त्याने त्याचा देशबांधव मोहम्मद नबीला (292 रेटिंग) दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. उमरझाईच्या खात्यात सध्या 296 रेटिंग जमा झाले आहेत. हे त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च रेटिंग आहे.
उमरझाईने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या आणि 41 धावाही केल्या. अफगाणिस्तानकडून पराभव पत्करून इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडला. उमरझाईने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 67 धावा केल्या पण पावसामुळे सामना रद्द झाला.
भारताचा फिरकीपटू अक्षर पटेल 17 स्थानांनी पुढे सरकून 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या खात्यात 194 रेटिंग जमा झाले आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध 42 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 धावा केल्या. या दोन्ही सामन्यात त्याने मोक्याच्या क्षणी प्रत्येकी एक-एक विकेटही घेतली.
गोलंदाजांच्या क्रमवारीत, अनुभवी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (609) तीन स्थानांनी पुढे गेला आहे. तो आता 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 48 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीला (649) तीन स्थानांचा फायदा झाला आहे. त्याने भारताविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महेश तिक्षणा (680) हा नंबर वन तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज (660) दुसऱ्या स्थानावर आहे. कुलदीप यादव (637) हा टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय गोलंदाज आहे. तो सहाव्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा स्टार लेग-स्पिनर रशीद खान (६४०) पाचव्या क्रमांकावर आहे.