पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma ICC ODI Ranking : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ICCच्या वनडे क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने या महिन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती, ज्याचा त्याला ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे. 765 रेटिंगसह त्याने त्याचा सलामीचा जोडीदार शुभमन गिलला मागे टाकले आहे. गिलची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
हिटमॅनने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 3 सामन्यात 52.33 च्या सरासरीने आणि 141.44 च्या स्ट्राईक रेटने 157 धावा फटकावल्या. दरम्यान, त्याने 2 अर्धशतकेही झळकावली. त्याच्याशिवाय बहुतेक भारतीय फलंदाजांनी निराशा केली. त्या मालिकेत भारताला 0-2 ने मालिका गमवावी लागली.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 824 रेटिंगसह अव्वल स्थानावर कायम आहे. गिलच्या खात्यात 763 रेटिंग असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. त्याचे 746 रेटिंग आहेत. कोहली आणि गिलने मागील मालिकेत निराशा केली होती. या 3 खेळाडूंशिवाय इतर कोणत्याही भारतीय फलंदाजाचा टॉप-10 मध्ये समावेश नाही.
कोहली एवढेच आयर्लंडच्या हॅरी टॅक्टरचे रेटींग आहे. तो संयुक्तपणे चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 728 रेटिंगसह सहाव्या तर डेव्हिड वॉर्नर 723 रेटिंगसह 7व्या क्रमांकावर कायम आहे. श्रीलंकेच्या पाथुम निसांकालाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो आता 708 रेटिंगसह आठव्या क्रमांकावर आला आहे. डेव्हिड मलान 9व्या तर दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर ड्युसेन 10व्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.
इंग्लंडच्या डेव्हिड मलानला एका जागेचा फटका बसला आहे. तो आता 707 रेटिंगसह नवव्या क्रमांकावर आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा रॉसी वँडर ड्युसेन 701 रेटिंगसह 10 व्या क्रमांकावर आहे.
श्रीलंका संघ 1997 नंतर प्रथमच भारताला वनडे मालिकेत पराभूत करण्यात यशस्वी झाला. त्यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कुसल मेंडिस आणि अविष्का फर्नांडो यांना फायदा झाला आहे. ते अनुक्रमे 39व्या आणि 68व्या स्थानावर पोहचले आहेत. याशिवाय नेदरलँडचा आक्रमक सलामीवीर मॅक्स ओ'डॉड 10 स्थानांनी पुढे सरकत 54 व्या स्थानावर आला आहे. तर अमेरिकेचा मोनंक पटेलला 11 स्थानांचा फायदा घेत 56 व्या स्थानावर झेपावला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने कारकिर्दीतील नवे सर्वोच्च रेटिंग मिळवले. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 86 आणि नाबाद 15 धावांची खेळी खेळली. तो 16 व्या स्थानावर पोहोचला. टोनी डी जोर्जीने पहिल्या डावात 78 धावा केल्या होत्या. तो 29 स्थानांच्या सुधारणेसह 85 व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डर (67) आणि ॲलेक अथेनेस (76) यांनाही फायदा झाला आहे.