

पुढारी ऑनलाईन डेस्क : Babar Azam Captaincy Resign : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघात भूकंप झाला आहे. बाबर आझमने तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने बुधवारी सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली. या विश्वचषकात पाकिस्तान संघाला 9 पैकी केवळ 4 सामने जिंकता आले आणि उपांत्य फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही.
पाकिस्तान संघ विश्वचषकाच्या साखळी फेरीतून बाहेर पडला. या संघाला 9 पैकी फक्त 4 सामने जिंकता आले. ज्या बाबरचा हा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिला. दरम्यान, एकूण स्पर्धेत कर्णधार बाबर आझमलाही फलंदाजीत फारशी कमाल दाखवता आली नाही. अशा स्थितीत अनेक दिग्गज आणि चाहत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.
बाबरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. पहिल्यांदा कर्णधारपद मिळाल्याच्या घटनेची आठवण करून देत त्याने आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केले. मात्र, मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून खेळत राहणार असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.
कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाबाबत माहिती देताना बाबरने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, '2019 मध्ये पीसीबीकडून मला पाकिस्तानचे नेतृत्व करण्यासाठी कॉल आला तो क्षण मला चांगला आठवतो. गेल्या 4 वर्षांत, मी मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक चढउतार अनुभवले आहेत. पण जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा गौरव आणि सन्मान राखण्यासाठी मी मनापासून आणि पूर्ण समर्पणाने काम केले आहे. पाक संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचणे हे खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापन यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. या प्रवासात पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी दिलेल्या अतुट पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा एक कठीण निर्णय आहे पण मला वाटते की हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत राहीन. नवीन कर्णधार आणि संघाला माझा पूर्ण पाठिंबा असेल. मला ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही आभारी आहे.'