ICC ODI World Cup : कसोटी खेळणार्‍या सर्व देशांकडून इंग्लंड पराभूत | पुढारी

ICC ODI World Cup : कसोटी खेळणार्‍या सर्व देशांकडून इंग्लंड पराभूत

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला अफगाणिस्तानकडून 69 धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ मोठ्या अपसेटचा बळी ठरला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर इंग्लंडच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. विश्वचषकाच्या इतिहासातील सर्व कसोटी खेळणार्‍या देशांकडून पराभूत झालेला इंग्लंड हा पहिला संघ ठरला.

यंदा अफगाणिस्तानने विश्वचषकातील सलग पराभवाची मालिका संपुष्टात आणली. सलग 14 पराभवांनंतर या संघाने पहिला विजय नोंदवला. यापूर्वी अफगाणिस्तानने त्यांचा शेवटचा विजय फेब्रुवारी 2015 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध मिळवला होता. अफगाणिस्तानने वर्ल्डकपमध्ये एकूण 18 सामने खेळले, त्यापैकी 2 जिंकले आहेत.

इंग्लंडच्या पराभवाचा इतिहास

इंग्लंडला 1975 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला पराभव पत्करावा लागला होता. यानंतर 1979 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये इंग्लंडला वेस्ट इंडिजने मात दिली. 1983 आणि 1987 मध्ये इंग्लंडला भारत आणि पाकिस्तान या आशियाई संघांनी पराभवाची धूळ चारली. न्यूझीलंडने 1983 मध्ये विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा इंग्लंडवर विजय मिळवला होता; तर 1992 ला इंग्लिश संघाला मोठा धक्का बसला होता. त्या स्पर्धेत झिम्बाब्वेने इंग्लंडला चितपट करून सर्वांनाच चकित केले होते. त्यानंतर 1996 च्या विश्वचषकात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव केला होता. 2011 च्या विश्वचषकात बांगला देश आणि आयर्लंडने इंग्लंडला पराभवाची कडू चव चाखण्यास भाग पाडले होते; तर आता 2023 मध्ये सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंडची धुळधाण उडवून दिली आहे. अशाप्रकारे, इंग्लंड क्रिकेट संघाने विश्वचषकाच्या इतिहासात सर्व 11 कसोटी खेळणार्‍या देशांकडून पराभव पत्करण्याचा लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे.

इंग्लंडच्या संघाचे प्रथमच फिरकीपुढे लोटांगण

वर्ल्डकपच्या इतिहासात इंग्लंड संघाने पहिल्यांदाच फिरकीपुढे लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. अफगाणविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचे 8 फलंदाज फिरकीच्या जाळ्यात अडकले. यात फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान आणि राशीद खान यांनी प्रत्येकी 3, तर मोहम्मद नबीने 2 बळी घेतले.

 

Back to top button