

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘रोहित शर्माने केवळ 25-30 धावा करून समाधानी राहू नये. त्याने मोठा डाव खेळण्यावर लक्ष केंद्रित करावे. क्रिजवरील त्याची उपस्थिती सामन्याला कलाटणी देऊ शकते,’ असा विश्वास भारताचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यांमध्ये 26.00 च्या सरासरीने 104 धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याचा स्ट्राईक रेट 107.21 राहिला आहे. रोहितने भारताला जलद सुरुवात करून दिली आहे. पण तो मोठा डाव खेळण्यात अपयशी ठरला आहे.
गावस्कर म्हणाले, ‘जर रोहित शर्मा 25 षटकांपर्यंत फलंदाजी करत राहिला तर टीम इंडियाला 180-200 धावांपर्यंतचा टप्पा गाठण्यात यश येईल. यादरम्यान, जर संघाने फक्त 2 विकेट गमावल्या तर हिटमॅन काय करू शकेल याची कल्पना करा. ज्यामुळे संघ नक्कीच निर्धारित 50 षटकांमध्ये 350 किंवा त्याहून अधिक धावांपर्यंत मजल मारू शकतो. रोहितने ही बाब लक्षात घ्यावी. आक्रमकपणे खेळण्यासोबतच 25-30 षटके फलंदाजी करण्याची संधी मिळविण्यासाठी त्याने थोडा संयम बाळगावा. जर त्याने असे केले तर तो प्रतिस्पर्धी संघाकडून सामना हिसकावून घेऊ शकतो. अशी खेळी सामना जिंकण्यासाठी उपयुक्त ठरते.’
‘रोहितने स्पर्धेत बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अनुक्रमे 41, 20, 15 आणि 28 धावा केल्या आहेत. मला वाटतं एक फलंदाज म्हणून, तुम्ही 25-30 धावांनी खूश आहात का? तुम्हाला आनंदी व्हायला नको! म्हणून मी त्याला म्हणेन की जर तुम्ही सात ते नऊ षटके खेळण्याऐवजी 25 षटके खेळली तर त्याचा संघावर खूप चांगला परिणाम होईल,’ असा सल्ला गावस्कर यांनी दिला.