

पुढारी ऑनलाईन डेस्क : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीचे वेळापत्रक अंतिम झाले आहे. पहिला सेमीफायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारी (4 मार्च) खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना सोपा नसेल. भारतीय संघ स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहशिवाय खेळत आहे. तर कांगारूंनाही पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड याची कमतरता भासणार आहे. पण दोन्ही संघांच्या अलीकडील कामगिरीकडे पाहता, हा सामना अत्यंत रोमांचक होईल यात शंका नाही. रोहितसेनेसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः 2023 च्या विश्वचषक अंतिम सामन्यातील पराभवाचा पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी चालून आली आहे. (Champions Trophy IND vs AUS Semi Final)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यापूर्वी आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत 2023च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भिडले होते. त्या सामन्यात ट्रॅव्हिस हेडच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया विश्वविजेता बनला. त्यानंतर 2024च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने कांगारूंना धूळ चारली. पण भारतीय भूमीवरील वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील टीम इंडियाच्या पराभवाचे दुःख अजूनही भारतीय चाहत्यांना सतावत आहे. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषक अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. भारताचा फायदा असा आहे की त्यांनी त्यांचे सर्व सामने दुबईच्या संथ खेळपट्ट्यांवर खेळले आहेत, तर ऑस्ट्रेलिया आतापर्यंत पाकिस्तानच्या सपाट खेळपट्ट्यांवर खेळला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमधील कामगिरीत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून येते. तसेच आयसीसी स्पर्धांमध्येही ऑस्ट्रेलियानेच सर्वाधिकवेळा बाजी मारली आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आघाडीवर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया एकूण 151 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने 84 वेळा विजय मिळवला आहे तर भारताने 57 सामने जिंकले आहेत. 10 सामन्यांचा निकाल लागला नाही.
आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ 18 वेळा आमनेसामने आले आहेत. यातील 10 सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. तर भारत 7 सामने जिंकले आहेत. एकदिवसीय विश्वचषकात या दोन्ही संघांमध्ये 14 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 9 वेळा विजय मिळवला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ही आकडेवारी बदलते. या स्पर्धेत दोन्ही संघांमध्ये चार लढती झाल्या आहेत. ज्यातील 2 सामने भारताने तर एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. तर 2009 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामना पावसामुळे रद्द झाल्याने निकाल लागला नव्हता. विशेष म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचे दोन्ही पराभव नॉकआउट सामन्यांमध्ये झाले आहेत. भारताकडून पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलिया 1998 आणि 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला होता. 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला होता, ज्यामध्ये न्यूझीलंड विजेता ठरला.
आयसीसीच्या बाद फेरीत दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत कठीण स्पर्धा दिसून आली आहे. आयसीसी नॉकआउटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया 8 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. दोन्ही संघांना प्रत्येकी 4 सामने जिंकण्यात यश आले आहेत. तथापि, भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाने गेल्या 3 आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये भारताला पराभूत केले आहे. 2015 पासून, टीम इंडियाला आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवता आलेले नाही. आयसीसी नॉकआउटमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा शेवटचा विजय 2011 च्या विश्वचषकात मिळवला होता.
1998 : भारत विजयी (चॅम्पियन्स ट्रॉफी)
2000 : भारत विजयी (चॅम्पियन्स ट्रॉफी)
2003 : ऑस्ट्रेलिया विजयी (एकदिवसीय विश्वचषक)
2007 : भारत विजयी (टी-20 विश्वचषक)
2011 : भारताने जिंकला (एकदिवसीय विश्वचषक)
2015 : ऑस्ट्रेलिया विजयी (एकदिवसीय विश्वचषक)
2023 : ऑस्ट्रेलिया विजयी (जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच WTC)
2023 : ऑस्ट्रेलिया विजयी (एकदिवसीय विश्वचषक)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, कुलदीप यादव
स्टीव स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबुशेन, जॉश इंग्लिस (विकेटकीपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, सीन अॅबॉट, नाथन एलिस, अॅडम झॅम्पा, स्पेन्सर जॉन्सन, जॅक फ्रेझर-मॅकगर्क
टॉस : भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 2 वाजता
सामन्याची सुरुवात : दुपारी 2:30 वाजता
हा सामना स्टार स्पोर्ट्स 2 HD/SD (इंग्रजी) आणि स्पोर्ट्स 18 वन HD/SD (हिंदी) वर थेट प्रक्षेपित केला जाईल. तसेच, डिजिटल प्लॅटफॉर्मवर जिओहॉटस्टारवर थेट स्ट्रीमिंगद्वारे पाहता येईल.