

अॅस्ताना, वृत्तसंस्था : 17 व्या विश्व बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठी सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेच्या दुसर्या फेरीत रशियाच्या इयान नेपोम्नियाचीने चीनच्या डिंग लिरेनला दुसर्या फेरीत पराभवाचा जबरदस्त धक्का दिला. नेपोम्नियाची येथे काळ्या मोहर्यांनी खेळत होता. केवळ 29 चाली व साडेतीन तासांच्या खेळीत नेपोम्नियाचीने हे लक्षवेधी यश मिळवले. यापूर्वी उभयतांतील पहिला डाव बरोबरीत सुटला होता.
सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत खेळवल्या गेलेल्या दुसर्या डावात डिंग लिरेनने नेपोम्नियाचीला त्याची थेरॉटिकल तयारी उलथवून टाकण्यासाठी पटावर काही आश्चर्यकारक चाली रचल्या. या रणनीतीमुळे एकवेळ डिंग पटावर अधिक सरस स्थितीत होता. शिवाय, नेपोम्नियाचीच्या तुलनेत त्याच्याकडे वेळही अधिक बाकी होता; पण मिडल गेममध्ये याचा डिंगला अजिबात लाभ घेऊ शकला नाही. उलटपक्षी, त्याने नेपोम्नियाचीला आघाडी देऊन पटावर वर्चस्व प्रस्थापित करण्याची नामी संधी देऊ केली आणि अनुभवी नेपोम्नियाचीने या संधीचे सोने केले नसते तरच नवल होते. डिंगची एच 3 ही चौथी चाल अतिशय दुर्मीळ चालींपैकी एक मानली गेली.
डिंगला मधल्या टप्प्यात दडपण कमी करण्यासाठी हत्तीच्या बदल्यात एक उंट व दोन प्याद्यांचा बळी देणे भाग होते; पण तरीही डाव वाचवण्यासाठी हे प्रयत्न अपुरे ठरले. नेपोम्नियाचीने संधी मिळताच वर्चस्व प्रस्थापित करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले.
दुसरीकडे, भक्कम स्थितीतून अचानक डाव वाचवण्याची वेळ आलेल्या डिंगसमोर टाईम प्रेशरचेदेखील आव्हान होते. पहिल्या टाईम कंट्रोलमध्ये 3 मिनिटांत शेवटच्या 15 चाली करणे भाग होते. त्याचा डिंगला काही प्रमाणात फटका बसला. पांढर्या मोहर्यांनी खेळताना डिंग बराच झगडला आणि अंतिमत: त्याला पराभव मान्य करावा लागला.
एफ 5 या 18 व्या चालीनंतर आपल्याला विजय दिसू लागला होता, असे नेपोम्नियाचीने सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नमूद केले. डिंग लिरेननेदेखील पुढे याच चालीचा उल्लेख केला. 18 व्या चालीनंतर माझ्यासाठी पटावर अतिशय कठीण परिस्थिती होती. मी या सामन्यात एकाही संधीचा लाभ घेऊ शकलो नाही, असे लिरेन म्हणाला. मंगळवारी या स्पर्धेतील विश्रांतीचा दिवस होता. आज बुधवार, दि. 12 रोजी स्पर्धेतील तिसरा डाव खेळवला जाणार आहे.