

पुढारी ऑनलाईन डेस्क : लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी)चा स्फोटक फलंदाज निकोलस पूरन याला सिक्स मारण्याची मशीन म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही. त्याने आयपीएल 2025 च्या फक्त दोन सामन्यांमध्ये 13 षटकार मारले आहेत. यातील 6 षटकार सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यादरम्यान ठोकले. यावर पूरन म्हणतो की. ‘मी षटकार मारण्याची कोणतीही योजना आखत नाही. चेंडूला योग्यवेळी टाइम करून दिशा देण्याचा प्रयत्न करतो.’
26 चेंडूत 70 धावांची वादळी खेळी खेळल्यानंतर, पूरन म्हणाला, ‘मी गेल्या नऊ वर्षांत यावर काम केले आहे. शिवाय, मला पॉवरप्लेमध्ये फलंदाजी करण्याची संधी देखील मिळत आहे, ज्याचा मला निश्चितच फायदा होत आहे. जेव्हा विकेट चांगली असते आणि तुमच्याविरुद्ध सामना सोपा असतो तेव्हा संधींचा फायदा घेणे महत्वाचे आहे.’
पूरनने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे आयपीएलमधील त्याचे तिसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. तो म्हणाला, ‘मी माझ्या बॅटच्या वेगावर कधीही काम केले नाही पण माझ्याकडे प्रतिभा आहे. मी गेल्या काही वर्षांत केलेल्या मेहनतीचे आता फळ मिळत आहे. संघासाठी सामना जिंकण्यात योगदान देऊ शकतो याचा मला आनंद आहे.’
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पूरन आणि मिशेल मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी केली. मार्शने स्पर्धेतील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले.
मार्शबद्दल बोलताना पूरन म्हणाला, ‘आयपीएल ही दीर्घ चालणारी स्पर्धा आहे. मार्शला वरच्या फळीत फलंदाजी करताना पाहणे खूप छान आहे. विशेषतः वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याने त्याचा क्लास दाखवला आहे. आमची शॉट्सची निवड योग्य होत असून आम्ही विकेट टाकत नाही. याशिवाय, आमची जोडी उजवी आणि डावी फलंदाजांची आहे, जी प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी ठरते. गोलंदाजांचे कच्चे दुवे लक्षात येताच आम्ही त्यांना लक्ष्य करण्यात कसर सोडत नाही,’ असे त्याने सांगितले.
पत्रकार परिषदेत पूरनचे कौतुक करताना मार्श म्हणाला, ‘निकोलस पूरन अद्भुत खेळाडू आहे. त्याला थांबवणे जवळजवळ अशक्य असते. मी त्याच्याविरुद्धही खेळलो आहे, पण यंदाच्या आयपीएल हंगामात मी त्याच्याशी जोडला गेलो. आशा आहे की आमच्या जोडीला या हंगामात बराच काळ फलंदाजी करण्याची संधी मिळेल.’