

hrishikesh kanitkar appointed head coach of india a team for england tour
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारत 'ए' संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी अष्टपैलू ऋषिकेश कानीटकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत 'ए' संघ 30 मे पासून इंग्लंड दौऱ्यावर तीन चार-दिवसीय सामने खेळणार आहे. या दौऱ्यात राजीब दत्ता (गोलंदाजी प्रशिक्षक) आणि जॉयदीप भट्टाचार्य (फिल्डिंग प्रशिक्षक) हे कानीटकर यांना सहाय्य करणार आहेत.
भारत ए संघाच्या दौऱ्याचा उद्देश हा युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करणे आहे. या दौऱ्यात युवा संघ इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन सामने खेळणार असून तिसरा सामना टीम इंडियाच्या वरिष्ठ संघाविरुद्ध खेळला जाईल. ही लढत सिक्रेट असणार आहे. त्या सामन्याला खेळाडू आणि स्टाफ व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश नसेल. या सामन्याचे चित्रीकरणही होणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
पहिला सामना : 30 मे ते 2 जून, कँटरबरी येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध
दुसरा सामना : 6 ते 9 जून, नॉर्थॅम्प्टन येथे इंग्लंड लायन्सविरुद्ध
तिसरा सामना : 13 ते 16 जून, बेकेनहॅम येथे भारत वरिष्ठ संघाविरुद्ध (सिक्रेट सामना)
या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या 18 सदस्यीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे दुसऱ्या सामन्यापूर्वी संघात सहभागी होणार आहेत.
हा दौरा भारताच्या वरिष्ठ संघाच्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेची तयारी म्हणून महत्त्वपूर्ण आहे. वरिष्ठ संघाची निवड मेच्या अखेरीस होणार असून, संघ 6 जूनला इंग्लंडला रवाना होईल. पहिला कसोटी सामना 20 जूनपासून हेडिंग्ले, लीड्स येथे खेळवला जाईल.
ऋषिकेश हेमंत कानिटकर हे एक माजी भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांनी भारतासाठी टेस्ट आणि वनडे सामने खेळले आहेत. ते डावखुरे फलंदाज आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करणारे खेळाडू होते.
2015 मध्ये निवृत्त होताना, ते रणजी ट्रॉफीत 8000 हून अधिक धावा करणाऱ्या केवळ तीन फलंदाजांपैकी एक होते. तसेच, रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एलीट आणि प्लेट दोन्ही लीगचे विजेतेपद मिळवणारे एकमेव कर्णधार होते.
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), ध्रुव ज्युरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, नितीशकुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर, इशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कम्बोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुभमन गिल आणि साई सुदर्शन. (दोघेही दुसर्या सामन्यापासून उपलब्ध होतील.)