वर्ल्डकपपूर्वी संघातील प्रयोग किती फायदेशीर?

वर्ल्डकपपूर्वी संघातील प्रयोग किती फायदेशीर?
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघ 1932 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. भारताने पहिला वन डे सामना 1974 मध्ये तर पहिला टी-20 सामना 2006 मध्ये खेळला. भारताने आतापर्यंत 1700 हून अधिक सामने खेळले आहेत. आधी लिंबूटिंबू ते एक बलाढ्य क्रिकेट संघ असा भारताचा क्रिकेटमधील प्रवास आहे, पण या 91 वर्षांच्या काळात संघाचा सर्वात वाईट काळ कोणता आहे, असा प्रश्न विचारला तर सर्वांच्या मुखातून एकच उत्तर येईल ते म्हणजे 2007 ची विश्वचषक स्पर्धा.

या स्पर्धेत पहिल्यांदा बांगला देश आणि नंतर श्रीलंकेकडून पराभूत होऊन भारत पहिल्या फेरीतच स्पर्धेतून बाहेर पडला. संपूर्ण देश निराश, नाराज आणि तितकाच संतापलेला होता. त्यावेळी भारताचे प्रशिक्षक होते, ग्रेग चॅपेल आणि कर्णधार होता राहुल द्रविड. आता भारतीय संघ दोन महिन्यांवर आलेल्या वर्ल्डकपची तयारी करीत आहे. यावेळी राहुल द्रविड प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे आणि त्याच्याकडून तीच चूक होत आहे, जी 2007 च्या वर्ल्डकपमध्ये झाली होती.

फलंदाजी क्रमातील खेळखंडोबा

2007 च्या विश्वचषक स्पर्धेपूर्वी ग्रेग चॅपेल यांनी प्रशिक्षक म्हणून सूत्रे हाती घेतली आणि त्यांनी संघाची बसलेली घडी विस्कटून टाकली. तरुण खेळाडूंना संधी आणि वरिष्ठांना नारळ देताना त्यांनी संघाची अक्षरश: वाट लावून टाकली. चॅपेल यांनी संघातील फलंदाजीच्या क्रमात वाट्टेल तसे बदल केले. संघाचा सलामीवीर म्हणून सचिन तेंडुलकर फिट होता; परंतु त्याला चौथ्या क्रमांकावर ढकलण्यात आले. त्याच्या जागी रॉबिन उथप्पाला ओपनर करण्यात आले. तिसर्‍या क्रमांकावर कधी इरफान पठाणला खेळवले गेले तर कधी महेंद्रसिंग धोनीला. स्पर्धेच्या पहिल्या तीन सामन्यांत तीन वेगवेगळ्या जोड्या मैदानात उतरल्या. वीरेंद्र सेहवागला सामन्याच्या आधी काही वेळ माहीत पडायचे की आपण कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे. इरफान पठाण चांगली स्विंग गोलंदाजी करीत होता.

स्पर्धेच्या आधी चॅपेल यांनी त्याला टॉप ऑर्डर फलंदाज केला, पण फलंदाजीत तो अपयशी ठरला तर गोलंदाजीही तो भरकटला. यामुळे 'तेलही गेले अन् तूपही गेले' अशी त्याची अवस्था झाली. परिणामी त्याला वर्ल्डकपच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये जागाच मिळाली नाही. इतक्या सगळ्या ताकतुंब्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. भारत त्यावेळेच्या लिंबूटिंबू बांगला देश संघाकडून धक्कादायकरीत्या पराभूत झाला. स्पर्धेतील आव्हान टिकण्यासाठी श्रीलंकेला पराभूत करणे आवश्यक असताना त्यांच्याकडूनही ते पराभूत झाले, अन् भारताला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.

कर्णधारापासून बॉलिंगपर्यंत सगळीकडे प्रयोग

अनिल कुंबळे 2005 पासून मोजकेच वन डे सामने खेळत होता. त्याला 2007 च्या वर्ल्डकप संघात स्थान मिळाले. तर चार-पाच वर्षे वन डे संघाचा अविभाज्य घटक असलेल्या मोहम्मद कैफला संघातून वगळण्यात आले. त्यावेळी सेहवागला मोजक्या सामन्यात कर्णधारपद मिळत होते. यावेळीही तशीच अवस्था पाहायला मिळत आहे. 2013 मध्ये शेवटचा वन डे खेळलेल्या जयदेव उनाडकटची संघात एन्ट्री झाली आहे. शिखर धवन बाहेर झाला असून हार्दिक पंड्याने दुसर्‍या सामन्यात नेतृत्व केले.

वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाला दहा वन डे सामने खेळायचे आहेत. त्यामुळे या दहा सामन्यांत वर्ल्डकपसाठी निवडण्यात येणार्‍या संभाव्य खेळाडूंना सराव मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु शार्दूल ठाकूर वगळता एकही गोलंदाज सध्या सामने खेळत नाही. मोहम्मद शमी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपासून आराम करीत आहे. तो आता थेट आशिया चषकांत खेळताना दिसेल. डब्ल्यूटीसी फायनलनंतर रोहित चार तर कोहली तीन सामन्यांत खेळला आहे. वेस्ट इंडिजनंतरच्या तिसर्‍या वन डे नंतर त्यांना पुन्हा एक महिन्याचा आराम मिळणार आहे. त्यानंतर ते थेट पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेेंबरला मैदानात उतरतील. वर्कलोड, रोटेशन यामुळे खेळाडूंना मिळणार्‍या संधीत जर सातत्य नसेल तर वर्ल्डकपची तयारी योग्य दिशेने सुरू आहे का? असा प्रश्न पडतो.

सोळा वर्षांनंतरही 'येरे माझ्या मागल्या…'

हा सगळा इतिहास येथे सांगायचे म्हणजे त्याची पुनरावृत्ती आता होत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात रोहित शर्मा सातव्या क्रमांकावर उतरला. विराटला तर बॅटिंगच मिळाली नाही. दुसर्‍या सामन्यात रोहित, विराटला विश्रांती देण्यात आली. संजू सॅमसन तिसर्‍या तर अक्षर पटेल चौथ्या क्रमांकावर उतरला. यापूर्वी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या सामन्यात अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर खेळला होता. जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध मधल्या फळीत खेळणारा इशान आता ओपनिंगला येतो आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news