

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK Hockey Match : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनला पराभूत करून कांस्यपदक जिंकणारा भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील एकूण 6 संघ सहभागी होत आहेत. यादरम्यान, भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. या हायव्होल्टेज सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 8 सप्टेंबरपासून सुरू होणार असून स्पर्धेचा अंतिम सामना 17 तारखेला होणार आहे. ही स्पर्धा चीनमधील हुलुनबुर येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान व्यतिरिक्त यजमान चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियाचे संघ सहभागी होणार आहेत.
भारताचा पहिला सामना 8 सप्टेंबरला चीनशी होणार आहे. यानंतर 9 सप्टेंबरला भारतीय संघ जपानशी, 11 सप्टेंबरला मलेशिया आणि 12 सप्टेंबरला दक्षिण कोरियाशी भिडणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 4 सप्टेंबरला महामुकाबला रंगणार आहे.
स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध एक-एक सामना खेळणार आहे. अव्वल 4 संघांना उपांत्य फेरीत स्थान मिळेल. भारतीय हॉकी संघाने नुकतेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत जर्मनीविरुद्धच्या निकराच्या सामन्यात जरी पराभवाचा सामना करावा लागला असला तरी संघाने कांस्यपदक पटकावले. टोकियो ऑलिम्पिकनंतर पुन्हा एकदा भारताने सलग दुस-यांना कांस्यपदकावर मोहोर उमटवली. 1972 नंतर भारताने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे.