

Rohit Sharma Harmanpreet Kaur Padma Award
नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारकडून प्रतिष्ठित 'पद्म' पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या गौरवमूर्तींच्या यादीत भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज तारे रोहित शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १३१ व्यक्तींच्या यादीत क्रीडा क्षेत्रातील एकूण ९ खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये २०२४ चा टी-२० वर्ल्ड कप आपल्या नेतृत्वाखाली जिंकून देणारा भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय महिला संघाची यशस्वी कर्णधार हरमनप्रीत कौर यांना 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २०२५ मध्ये आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर (ODI World Cup) आपले नाव कोरले होते. आयसीसी ट्रॉफी जिंकणारी ती पहिली भारतीय महिला कर्णधार ठरली.
रोहित शर्माची गणना जागतिक क्रिकेटमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकण्यासोबतच २०२५ ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील पटकावली आहे. रोहित आणि हरमनप्रीत यांच्यासह भारतीय पुरुष संघाचा माजी वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार यालाही 'पद्मश्री' जाहीर झाला आहे.
माजी दिग्गज टेनिस खेळाडू विजय अमृतराज यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त क्रीडा क्षेत्रातून 'पद्मश्री' मिळवणाऱ्यांमध्ये खालील नावांचा समावेश आहे:
सविता पुनिया (हॉकी)
के. पजनीवेल
बलदेव सिंह
भगवानदास रायकवार
व्लादिमीर मेस्टविरिश्विली (जॉर्जिया)
पुरस्कारांची एकूण आकडेवारी यंदाच्या वर्षी ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत १९ महिला, ६ परदेशी किंवा अनिवासी भारतीय व्यक्ती आणि १६ मरणोत्तर पुरस्कारांचा समावेश आहे.