

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉक्सर हितेशने शुक्रवारी (4 एप्रिल) भारतासाठी इतिहास रचला. ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग कप 2025च्या अंतिम फेरीत त्याने धडक मारली असून अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय बॉक्सरपटू ठरला आहे. त्याच्याशिवाय भारताचे तीन अन्य बॉक्सर्स जदुमणी सिंग, सचिन आणि विशाल यांचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव झाला. त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. (Indian Boxer Hitesh Boxing World Cup 2025 final)
हितेशने 70 किलो वजनगटात फ्रान्सच्या मकान त्राओरेचा 5-0 ने पराभव केला. सर्व पाच पंचांनी हितेशच्या बाजूने निकाल दिला. या लढतीदरम्यान त्याचा एक गुण कमी करण्यात आला होता, पण तरीही भारतीय खेळाडूला कोणताही फटका बसला नाही. त्याआधी हितेशने इटलीच्या गॅब्रिएल गुइडी रोनटानीला 5-0 ने पराभूत करून उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते.
उपांत्य फेरीच्या इतर सामन्यांमध्ये 60 किलो वजनीगटात जदुमणी सिंगला उझबेकिस्तानच्या ए. जलिलोवने 3-2 असे पराभूत केले. जदुमणी यापूर्वी ब्रिटनच्या एलिस ट्रोब्रिजचा पराभव करून उपांत्य फेरीत पोहोचला होता. तर सचिन (60 किलो) आणि विशाल (90 किलो) यांना सुरुवातीच्या फेरीत बाय मिळाल्यामुळे ते थेट उपांत्य फेरीत पोहचले होते. मात्र, सचिनला पोलंडच्या पावेल ब्राचने मात दिली, तर विशालला उझबेकिस्तानच्या टी. खबीबुल्लाएव याच्याकडून 5-0 ने पराभव स्विकारावा लागला.