

इंदूर : भारतीय युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात धावांच्या बाबतीत थोडा महागडा ठरला असला, तरी त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. १० षटकांत ८४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेत हर्षितने भारताच्या दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत एक विशेष विक्रम आपल्या नावे केला.
हर्षित राणाने न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉनवे (५), विल यंग (३०) आणि ख्रिस्तियन क्लार्क (११) या तिघांना तंबूत धाडले. या ३ बळींसह हर्षितने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिल्या १४ सामन्यांत सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. त्याने जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
अजित आगरकर : ३२
इरफान पठाण : २७
हर्षित राणा : २६
प्रसिद्ध कृष्णा : २५
रवींद्रचंद्रन अश्विन : २४
जसप्रीत बुमराह : २४
६ फेब्रुवारी २०२५ रोजी पदार्पण करणाऱ्या हर्षितने या मालिकेत एकूण ६ बळी घेतले आहेत. पहिल्या सामन्यात ६५ धावांत २ बळी आणि दुसऱ्या सामन्यात ५२ धावांत १ बळी घेत त्याने आपली छाप पाडली होती. आता या मालिकेनंतर हर्षितला एकदिवसीय क्रिकेट खेळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण भारतीय संघ पुढील सहा महिने एकदिवसीय मालिका खेळणार नाही. भारताचा पुढचा एकदिवसीय दौरा जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध होणार आहे.