

बर्लिन : इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन सामन्यात 60 व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरल्यानंतरही शानदार हॅट्ट्रिक साजरी करण्यात यशस्वी ठरला आणि या जोरावर गतविजेत्या बायर्न म्युनिचने स्टुटगार्टचा त्यांच्याच मैदानावर 5-0 असा दारुण पराभव करत बुंदेस्लिगात आपली आघाडी 11 गुणांपर्यंत वाढवली. केनने या विजयासह बायर्न म्युनिचसाठी या हंगामातील आपल्या गोलची संख्या 28 पर्यंत नेली.
केन राखीव बाकावर असताना, कॉन्राड लाईमरने उत्कृष्ट फिनिशिंग केले. ऑस्ट्रियाच्या या मिडफिल्डरने एक लांब पास घेतला आणि मायकेल ओलिसेसोबत समन्वयाने दमदार आक्रमण केले. त्यानंतर 11 व्या मिनिटाला त्याने गोलरक्षक अलेक्झांडर न्यूबेलला चकवत जवळून गोल केला. केनने एका लो फटक्यावर 2-0 अशी आघाडी घेतली आणि जोसिप स्टानिसीकच्या नावावरही एका गोलची भर पडली. 81 व्या मिनिटाला लॉरेन्झ असिग्नॉनने हाताने चेंडू क्लियर केल्याबद्दल स्टुटगार्टला 10 खेळाडूंवर समाधान मानावे लागले. त्यानंतर केनने पेनल्टी स्पॉटवरून गोल करत आघाडी आणखी भक्कम केली.
दोन मिनिटे बाकी असताना, ओलिसेच्या क्रॉसवर केनने चेंडूला फ्लिक करत एकतर्फी विजय आणखी भरभक्कम केला. क्लब आणि देशासाठी मिळून त्याने या हंगामात आतापर्यंत 33 गोल केले आहेत. यात इंग्लंडसाठी नोंदवलेल्या पाच अतिरिक्त गोलांचा समावेश आहे. स्टुटगार्टला पूर्वार्धापूर्वी गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या; पण त्यांच्या फटक्यांमध्ये जान नव्हती.