ICC T20 Rankings : हार्दिक पंड्याची अव्वल स्थानावरून घसरण! वर्ल्डकप जिंकूनही फटका

एका आठवड्यातच पहिले स्थान गमावले
Hardik Pandya ICC T20 Rankings
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला आयसीसी क्रमवारीत फटका बसला आहे. Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : Hardik Pandya ICC T20 Rankings : आयसीसीने टी-20 ची नवीन क्रमवारी नुकतीच जाहीर केली. यामध्ये टीम इंडियाचे फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंह यांनी मोठी झेप घेतली आहे. ऋतुराजने टॉप-10 मध्ये प्रवेश केला असून रिंकूनेही चार स्थानांनी झेप घेत 39 वे स्थान गाठले आहे. मात्र, भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला या नव्या क्रमवारीत फटका बसला आहे. त्याने अवघ्या एका आठवड्यातच अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीतील अव्वल स्थान गमावले आहे. तो दुस-या स्थानी पोहचला आहे. तर श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा आता क्रमांक एकचा अष्टपैलू बनला आहे.

अव्वल पाच अष्टपैलू

पहिल्या स्थानावरील हसरंगाच्या खात्यात 222 गुण जमा झाले आहेत. तर दुस-या क्रमांकावरील विश्वविजेत्या हार्दिक पंड्याचे 213 गुण आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस आहे, ज्याच्या नावावर 211 गुण आहेत. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझालाही (208) फायदा झाला आहे. तो हा जगातील चौथा सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. बांगलादेशचा शाकीब अल हसन (206) पाचव्या स्थानी आहे. टीम इंडियाचा अक्षर पटेल 12व्या स्थानावर कायम आहे. (Hardik Pandya ICC T20 Rankings)

फलंदाजी-गोलंदाजी क्रमवारीतही हार्दिकचे नुकसान

आयसीसी टी-20 फलंदाजी आणि गोलंदाजी क्रमवारीतही हार्दिकला नुकसान झाले आहे. फलंदाजीत दोन स्थानांनी घसरण होऊन तो 64व्या स्थानावर पोहचला आहे. तर गोलंदाजी क्रमवारीत त्याला चार स्थानांचा फटका बसला आहे. तो 56 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Hardik Pandya ICC T20 Rankings)

2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर टीम इंडिया सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौ-यातील पहिले दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना बुधवारी (दि. 10) होणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकाचा भाग असलेले फार कमी खेळाडू या दौऱ्याचा भाग आहेत. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय मधून निवृत्ती जाहीर केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news