

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार आहेत. खुद्द पंड्या आणि नताशाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दोघांनीही एकाच आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून याची माहिती दिली आहे. ज्यात त्यांनी हा निर्णय आमच्यासाठी किती कठीण होता अशी भावना व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पंड्या आणि नताशा हे वेगळे होत असल्याच्या बातम्या येत होत्या. नताशाने नुकतेच हार्दिकचे घर सोडले होते. ती थेट तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली आहे. अंबानींच्या लग्नातही पंड्या एकटाच मस्ती करताना दिसला.
पोस्ट शेअर करत हार्दिकने म्हटलंय की, ‘चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आणि हे नाते वाचवण्यासाठी सर्व काही दिले. पण आता आम्हा दोघांसाठी विभक्त होणे हाच योग्य निर्णय आहे असे वाटते. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता, एकत्र व्यतीत केलेले आनंदाचे क्षण, परस्परांचा आदर आणि एकमेकांचा सहवास, जे काही आम्ही एकत्र अनुभवले त्यात आम्ही एक कुटुंब म्हणून पुढे गेलो.’
आपला मुलगा अगस्त्याची काळजी कोण घेणार हे देखील हार्दिकने सांगितले. तो म्हणतो की, ‘आमच्या आयुष्यात अगस्त्य असणे ही भाग्याची बाब आहे. तो नेहमीच आमच्या जीवनाचा पाया राहील. आम्ही दोघे मिळून त्याची काळजी घेऊ. त्याला जगातील सर्व सुख मिळावे यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करेन. त्याच्या आनंदासाठी जे काही करता येईल ते करणार आहे. आम्हाला आशा आहे की तुमचा पाठिंबा मिळेल आणि या कठीण काळात आमची प्रायव्हसी समजून घ्याल.’
नताशा मंगळवारी (दि. 16) सर्बियामध्ये तिच्या पालकांच्या घरी गेली. याबाबतची माहितीही तिनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. यानंतर नताशा मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. नताशासोबत मुलगा अगस्त्यही दिसला होता.
नताशा ही सर्बियन मॉडेल आहे. 2012 मध्ये ती भारतात आली होती. प्रकाश झा यांच्या सत्याग्रह चित्रपटात ती आयटम साँगमध्ये झळकली. जे तिचे बॉलिवूडमधील पदार्पण ठरले. यानंतर ती बिग बॉस 8 आणि नच बलिए सारख्या रिॲलिटी शोचाही भाग राहिली.
नताशा आणि हार्दिक यांचा 1 जानेवारी 2020 रोजी साखपुडा पार पडला होता. त्यानंतर, कोविड काळात 31 मे 2020 रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांना अगस्त्य मुलगा नावाचा मुलगा आहे. ज्याचा जन्म 30 जुलै 2020 रोजी झाला. 14 फेब्रुवारी 2023 रोजी नताशा आणि हार्दिकचे दुसरे लग्न झाले होते.