

Hardik Pandya Mahieka Sharma: भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे अन् मॉडेल माहिका शर्मा यांचे एकत्रित अनेक फोटो अन् पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र हार्दिक पांड्याला माध्यम प्रतिनिधींनी माहिका शर्माचा काढलेला एक असाच व्हिडिओ आवडला नाही. त्यानं सोशल मीडियावर मोठी पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानं पापाराझ्झींचे हे cheap sensationalism असल्याचा आरोप केला.
हार्दिक पांड्या आपल्या पोस्टमध्ये लिहितो की, 'सतत लोकांच्या नजरेत राहणं त्यांचे अटेंशन असणे हे मी निवडलेल्या आयुष्याचा एक भाग आहे. मात्र आज सर्व हद्द ओलांडणारी एक घटना घडली आहे.'
हार्दिक म्हणाला, 'माहिका बांद्र्याच्या एका रेस्तराँच्या पायऱ्यांवरून खाली उतरत होती. त्यावेळी पापाराझींनी तिचा फोटो काढण्याचं ठरवलं. मात्र ज्या अँगलने त्यांनी माहिकाचा फोटो काढला त्या अँगलने कोणत्याही महिलेचा फोटो काढला जाऊ नये. एक खासगी क्षण एका cheap sensationalism मध्ये बदलला गेला.'
'हे काही हेडलाईनसाठी नाहीये. तुम्ही काय क्लिक करावं यासाठी देखील नाहीये. हा निव्वळ आदराचा प्रश्न आहे. महिलांची प्रतिष्ठा राखलीच पाहिजे. प्रत्येक गोष्टीची काही एक सीमा असते.' असे म्हणत पांड्याने पापाराझींवर आपला संताप व्यक्त केला.
माध्यम प्रतिनिधींबद्दल बोलताना पांड्या म्हणाला, 'माध्यम बंधू हे प्रत्येक दिवशी खूप कष्ट करत असतात. मी त्यांच्या धावपळीचा आदर करतो. मी कायम त्यांना सहकार्य करतो. मी सर्वांना एक विनंती करतो की तुम्ही थोडं विचारपूर्वक काम करा. प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कैद करायची नसते. प्रत्येक अँगलने फोटो काढलाच पाहिजे असं नाही. काहीतरी माणुसकी दाखवा. आभारी आहे.'
पांड्याच्या क्रिकेटबाबत बोलायचं झालं तर हार्दिक पांड्या हा टी २० क्रिकेटमध्ये एक मोठा माईल स्टोन गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. तो सध्या दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेची तयारी करत आहे. ही मालिका ९ डिसेंबर म्हणजे आजपासून सुरू होत आहे. तो टी २० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यापासून १४० धावा मागं आहे. तसेच १०० विकेट्स घेण्यापासून २ विकेट्स मागे आहे. जर तो यात यशस्वी झाला तर टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून १०० विकेट्स घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरणार आहे.