

अहमदाबाद; वृत्तसंस्था : ध्रुव जुरेल 75 व यशस्वी जैस्वाल 55 यांची आक्रमक अर्धशतके, तसेच आर्चर, तुषार देशपांडे यांच्या संयमी, भेदक गोलंदाजीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने येथील रोमांचक आयपीएल साखळी सामन्यात यजमान गुजरात टायटन्सचा 6 धावांनी पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 211 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातला 20 षटकांत 8 बाद 204 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानचा हा या हंगामातील दुसरा विजय असून गुजरातला अद्याप विजयाचे खाते उघडता आलेले नाही.
प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 6 बाद 210 धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने 36 चेंडूंत 55 धावा करत आक्रमक सुरुवात करून दिली, तर वैभव सूर्यवंशीने 18 चेंडूंत 31 धावांची वेगवान खेळी केली. या जोडीने 6.2 षटकांत 70 धावांची सलामी दिली. त्यानंतर ध्रुव जुरेलने डावाची सूत्रे हाती घेत 42 चेंडूंत 75 धावांची जबरदस्त खेळी साकारली. यात त्याने 5 चौकार आणि 5 षटकार ठोकले.
211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शनने 44 चेंडूंत 73 धावांची झुंजार खेळी केली. त्याने कुमार कुशाग्रसोबत (18) 78 धावांची सलामी दिली. मात्र, मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरले. ग्लेन फिलिप्स (3), वॉशिंग्टन सुंदर (4) आणि राहुल तेवतिया (12) स्वस्तात बाद झाल्याने गुजरातची धावगती मंदावली. अखेरच्या षटकांत राशीद खान (24) आणि रबाडाने (नाबाद 23) प्रयत्न केले, पण त्यांना विजय मिळवून देण्यात अपयश आले.
अशोक शर्माचा हंगामातील वेगवान चेंडू
गुजरातचा स्पीडस्टार अशोक शर्माने डावाच्या 16 व्या षटकातील शेवटचा चेंडू प्रतितास 154 कि.मी. वेगाने टाकण्याचा पराक्रम गाजवला. हा या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला.