

अहमदाबाद; वृत्तसंस्था : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या ‘आयपीएल’मधील सामन्यात यजमान गुजरात टायटन्सने (जीटी) कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) 5 गडी राखून पराभव केला. कर्णधार शुभमन गिलच्या 86 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर गुजरातने 181 धावांचे लक्ष्य 2 चेंडू शिल्लक असताना गाठले.
कॅमेरून ग्रीनचे झुंजार अर्धशतक
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. अजिंक्य रहाणे (0) आणि अंगकृष रघुवंशी (8) स्वस्तात बाद झाले. मात्र, कॅमेरून ग्रीनने 55 चेंडूंत 79 धावांची दमदार खेळी करत डाव सावरला. त्याने 7 चौकार आणि चार षटकारांची बरसात केली. मधल्या फळीत रॉवमन पॉवेलने 27 धावांचे योगदान दिले. गुजरातच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर ‘केकेआर’चा संघ 20 षटकांत सर्वबाद 180 धावसंख्या उभारू शकला. गुजरातकडून कागिसो रबाडाने 3, तर मोहम्मद सिराज आणि अशोक शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी टिपले.
गुजरात टायटन्सचा पाठलाग : गिलचे वर्चस्व
181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या शुभमन गिल आणि साई सुदर्शन (22) यांनी 57 धावांची सलामी दिली. शुभमन गिलने अवघ्या 50 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 86 धावा ठोकल्या. जोस बटलरने 15 चेंडूंत 2 चौकार, 2 षटकारांसह 25 धावांची वेगवान खेळी केली. सामन्याच्या उत्तरार्धात वरुण चक्रवर्तीने 2 बळी घेत ‘केकेआर’ला सामन्यात परत आणण्याचा प्रयत्न केला; पण राहुल तेवतिया आणि शाहरुख खान यांनी संयम राखत गुजरातला विजय मिळवून दिला. 19.4 षटकांत 5 बाद 181 धावा गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले.