

पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi Jaiswal : भारतीय कसोटी संघाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आता मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार नाही. त्याने या संघाशी असलेले वर्षानुवर्षेचे नाते संपवले आहे. या 23 वर्षीय फलंदाजाने मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)कडे संघ बदलीबाबत अर्ज सादर केला, जो लगेच मंजूर करण्यात आला. आता तो 2025-26 हंगामापासून गोवा संघाकडून खेळताना दिसणार आहे. आता त्याने मुंबई सोडण्याबाबत आपले मौन सोडले असून या निर्णयामागचे कारण स्पष्ट केले आहे.
जैस्वालने संघ बदलीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘मुंबई संघातून बाहेर पडण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. मी जे काही आहे ते मुंबईमुळे आहे. या शहराने मला क्रिकेटपटू बनवले आणि मी आयुष्यभर एमसीएचा ऋणी राहीन,’ अशी भावन व्यक्त केली.
‘मला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे आणि असोसिएशनने दिलेल्या संधींचा मला खूप फायदा झाला आहे. तथापि, माझ्या कारकिर्दीच्या आकांक्षा आणि वैयक्तिक परिस्थितीचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, मी माझा देशांतर्गत क्रिकेट प्रवास सुरू ठेवण्यासाठी गोव्याला जाण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे जैस्वालने स्पष्ट केले आहे.
तो पुढे म्हणाला, ‘गोव्याने मला त्यांच्या संघाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे. ही संधी एक नवीन आव्हान म्हणून मी स्वीकारली. असे असले तरी माझे पहिले लक्ष्य भारतासाठी चांगली कामगिरी करणे असेल. मी राष्ट्रीय संघाचा नसेन तेव्हा मी गोव्यासाठी खेळेन आणि स्पर्धेत त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करेन.’
गोव्याकडून खेळण्याच्या जैस्वालच्या या निर्णयामुळे मुंबई क्रिकेटमध्ये मोठा बदल दिसून येत आहे. तथापि, गोवा संघासाठी त्याचा प्रवास कसा होतो आणि तो रणजी ट्रॉफीमध्ये संघाला मोठ्या उंचीवर नेऊ शकतो का हे पाहणे मनोरंजक असेल.
गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए)चे सचिव शंबा देसाई यांनी पीटीआयला सांगितले की, ‘यशस्वी जैस्वाल आमच्याकडून खेळू इच्छितो आणि आम्ही त्याचे स्वागत करतो. तो पुढच्या हंगामापासून आमच्या संघाकडून खेळेल.’
यशस्वी गोव्याचा कर्णधार होऊ शकतो का, याबद्दल देसाई यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘जैस्वालकडे नेतृत्व क्षमता आहे. जीसीए देखील या दिशेने काम करत आहे.’
यशस्वी जैस्वालच्या आधीही मुंबईकडून खेळलेले काही खेळाडू गोव्यात गेले आहेत. 2022-23 हंगामापूर्वी अर्जुन तेंडुलकर आणि सिद्धेश लाड यांनीही मुंबई सोडली आणि ते गोव्यात गेले. नंतर, लाडचे मुंबई रणजी संघात पुनरगम झाले.
जैस्वाल भारतीय कसोटी संघासाठी सातत्याने सलामी देत आहे. जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केल्यापासून, त्याने 19 कसोटी सामने खेळले आहेत आणि त्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.