

बर्लिन/ॲमस्टरडॅम : अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी जर्मनी व नेदरलँडस्ने अगदी थाटात आपले स्थान निश्चित केले. युरोपीय पात्रता फेरीच्या शेवटच्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी गोलचा वर्षाव करत, या जागतिक स्पर्धेचे आपण प्रबळ दावेदार असल्याचे अधोरेखित केले.
जर्मनीचे मुख्य प्रशिक्षक ज्युलियन यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या जर्मनीने लिपझिग येथे स्लोव्हाकियाचा 6-0 असा धुव्वा उडवला, तर रोनाल्ड कोमन यांच्या नेदरलँडस्ने ॲमस्टरडॅममध्ये लिथुआनियाला 4-0 ने पराभूत केले. विश्वचषक पात्रतेसाठी दोन्ही संघांना केवळ बरोबरीची आवश्यकता होती. मात्र, त्यांनी बचावात्मक पवित्र्याऐवजी आक्रमक खेळावर भर दिला.
जर्मनीचा धडाका सामन्यापूर्वी गुणांच्या बाबतीत स्लोव्हाकियाशी बरोबरीत असलेल्या चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनीने सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली. 18 व्या मिनिटाला निक वोल्टेमेडने हेडरद्वारे पहिला गोल केला. त्यानंतर गनॅब्रीने आघाडी दुप्पट केली. लिरॉय सानेने मध्यंतरापूर्वी दोन गोल केले, तर रिडल बाकू आणि असान ओएड्राओगो यांनी उत्तरार्धात गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
‘अ’ गटातील अन्य एका सामन्यात नॉर्दर्न आयर्लंडने लक्झमबर्गचा 1-0 असा पराभव केला, तरीही त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मात्र, नेशन्स लीगमधील त्यांच्या क्रमवारीमुळे त्यांना मार्चमध्ये होणाऱ्या 16 संघांच्या युरोपीय प्ले-ऑफ फेरीत स्थान मिळाले आहे. लिथुआनियाला सुरुवातीपासूनच बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला.
फ्रँकी डी जोन्गने रचलेल्या चालीवर तिजानी रेइंडर्सने गोल करत संघाचे खाते उघडले. लिथुआनियाचा गोलरक्षक एडविनास गर्टमोनासने पूर्वार्धात चांगला बचाव केला; पण 8 व्या मिनिटाला कोडी गॅकपोनने पेनल्टीवर गोल केला आणि त्यानंतर गोलचा ओघ सुरू झाला. झावी सिमॉन्स आणि डोनिएल मालेन यांनी लागोपाठ गोल करत नेदरलँडस्चा विजय सुकर केला.
‘एल’ गटात आधीच अव्वलस्थान निश्चित केलेल्या क्रोएशियाने पिछाडीवरून मुसंडी मारत मॉन्टेनेग्रोचा 3-2 असा पराभव केला, तर चेक प्रजासत्ताकने जिब्राल्टरला 6-0 ने चिरडले. पोलंडने एका अटीतटीच्या सामन्यात माल्टावर 3-2 असा विजय मिळवला आणि ‘जी’ गटात नेदरलँडस्च्या पाठोपाठ दुसरे स्थान पटकावले.