मुंबई | Sunil Gavaskar : 5 सप्टेंबरपासून सुरू होणार्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी बीसीसीआयने नुकतेच चार संघ जाहीर केले. या चारही संघांत भारताच्या बर्याच आंतरराष्ट्रीय खेळाडूंची नावे दिसत आहेत. पण, या स्पर्धेसाठी निवडलेल्या चार संघांत मात्र रोहित शर्मा व विराट कोहली यांचे नाव नसल्याने सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रोहित, विराट यांच्यासह जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व हार्दिक पंड्या यांनाही बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या नियमातून सूट दिली आहे. वर्कलोड आणि फिटनेस डोळ्यासमोर ठेवता जसप्रीत बुमराहला दिलेल्या विश्रांतीचा बचाव मात्र गावसकरांनी केला. 2018 पासून हार्दिक पंड्या कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. दुलीप ट्रॉफीनंतर भारतीय खेळाडू बांगला देश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध कसोटी मालिकेत खेळताना दिसतील. पण, रोहित व विराट यांची दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या संघातील अनुपस्थिती लिटल मास्टर गावसकर यांना खटकली आहे. या अनुभवी खेळाडूंना बांगला देशविरुद्ध मालिकेपूर्वी सराव करण्याची ही संधी होती, असे गावसकर यांचे मत आहे.