

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. दिल्लीतील दोन्ही महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रगीतासह ‘गर्जा महाराष्ट्र माझा…’ हे राज्य गीतही गायले गेले.
या कार्यक्रमास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्यासह अपर निवासी आयुक्त डॉ. नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, स्मिता शेलार आणि दिल्लीतील महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र सदनात निवासी असणारे अभ्यागत, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याच्या सहकार्याने आणि कोकण हापूस आंबा उत्पादक संघ, देवगड, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ३ दरम्यान भौगोलिक मानांकन प्राप्त हापूस आंब्याचे विक्री प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले. हापूस आंबा विक्री प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद लाभला. पहिल्याच दिवशी हापूस आंब्याच्या सर्व २५० पेट्या सुरुवातीच्या काही तासांमध्ये संपल्या. मात्र ३ दिवस असलेल्या विक्री प्रदर्शनामधील आंबे पहिल्याच दिवशी संपल्याने गुरुवारी संध्याकाळी आंबे खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांना आंबे न मिळताच परत जावे लागले. मोठ्या संख्येने आंबे विक्री प्रदर्शनात आणायला पाहिजे होते, अशी अपेक्षा दिल्लीकर नागरिकांनी व्यक्त केली.