पुढारी ऑनलाईन डेस्क : Gary Kirsten Resigns : पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला आहे. अलीकडेच बाबर आझमच्या जागी मोहम्मद रिझवानला मर्यादित षटकांचा कर्णधार बनवण्यात आले. या घडामोडीनंतर दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. कर्स्टन यांच्या प्रशिक्षणातच भारतीय संघाने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. ते उत्कृष्ट रणनीती बनवण्यासाठी ओळखले जातात. मात्र त्यांचा पाकिस्तान क्रिकेटसोबतचा कार्यकाळ फार काळ टिकला नाही.
वृत्तानुसार, गॅरी कर्स्टन यांनी पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. एप्रिल 2024 मध्येच कर्स्टन यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते या पदावर केवळ 8 महिने राहू शकले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अलीकडेच प्रशिक्षकाकडून निवडीचे अधिकार काढून घेतले होते आणि त्यांना निवड समितीचा भागही बनवण्यात आले नव्हते.
कर्स्टन यांच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या नवीन मर्यादित षटकांच्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. पीसीबीने ही जबाबदारी रेड बॉल क्रिकेट प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्यावर सोपवली आहे. पीसीबीने सोशल मीडियावर पोस्ट करून ही माहिती दिली.