

पुढारी ऑनलाईन डेस्क : The Gabba Stadium : ब्रिस्बेनच्या ऐतिहासिक गाबा स्टेडियमबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. 2032 च्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकच्या आयोजनानंतर हे स्टेडियम जमीनदोस्त केले जाणार आहे. नवीन स्टेडियम ब्रिस्बेनच्या व्हिक्टोरिया पार्कमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारले जाईल. या मैदानाची प्रेक्षक क्षमता अंदाजे 63,000 असेल. क्वीन्सलँड सरकारने याची घोषणा केली आहे.
नवीन स्टेडियम ऑलिम्पिकच्या पायाभूत सुविधांच्या भाग म्हणून विकसित केले जात आहे. क्वीन्सलँडचे प्रीमियर डेव्हिड क्रिसफुली यांनी मंगळवारी (दि. 25) ऑलिम्पिक पायाभूत सुविधांबाबतच्या नव्या योजनांची घोषणा केली. त्यांनी या योजनेत क्रिकेटच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. तसेच सांगितले की, ‘नवीन स्टेडियम क्रिकेट आणि इतर खेळांसाठी एक उत्तम व्यासपीठ असेल.’
गाबा स्टेडियम हे क्रिकेट आणि एएफएल (ऑस्ट्रेलियन फुटबॉल लीग)साठी अनेक दशकांपासून प्रतिष्ठित ठिकाण राहिले आहे. आतापर्यंत या मैदानावर अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. मात्र, ऑलिम्पिक आणि भविष्यातील मोठ्या स्पर्धांसाठी अद्ययावत सुविधांची गरज लक्षात घेऊन हा मोठा निर्णय घेतला गेला आहे.
गेल्या काही वर्षांत, गाबाला मर्यादित सुविधांमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. हे तेच मैदान आहे जिथे 2021 च्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताने 1988 नंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाला हरवले होते. त्या सामन्यात भारतासाठी चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी महत्त्वपूर्ण खेळी केली. या मैदानाला ऑस्ट्रेलियाचा बालेकिल्ला म्हटले जायचे. येथे कोणत्याही संघाला यजमान ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव करणे खूप कठीण होते.
या मैदानावर आतापर्यंत अनेक ऐतिहासिक सामने खेळले गेले आहेत. परंतु आधुनिक गरजा लक्षात घेता, आता ते कोणत्याही सामन्याचे आयोजन करण्यासाठी योग्य मानले जात नाही. अशा परिस्थितीत, सरकारने ते जमीनदोस्त करून एक नवीन स्टेडियम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्वीन्सलँडच्या क्रीडा समुदायाला एक चांगली आणि आधुनिक सुविधा मिळेल, असे जाणकरांचे म्हणणे आहे.
नवीन स्टेडियम उभारण्याचा खर्च अंदाजे 3.8 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स असेल. येथे क्रिकेट, एएफएल आणि इतर आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करता येतील. आयसीसी स्पर्धा आणि बिग बॅश लीग सारख्या स्पर्धा रंगतील. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँड क्रिकेटने या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
खरेतर गाबाच्या पुनर्बांधणीसाठी 2.7 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स खर्च करायचे होते, पण विरोधामुळे ही योजना रद्द करण्यात आली. आता, सरकारने निर्णय घेतला आहे की गाबाची देखभाल करणे कठीण झाले आहे, म्हणून ते पाडले जाईल आणि एक नवीन आधुनिक स्टेडियम बांधले जाईल. गाबा स्टेडियमचे भविष्य बऱ्याच काळापासून अनिश्चित आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की इंग्लंडविरुद्धच्या आगामी अॅशेस मालिकेपर्यंत गाबा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आयोजन करेल, त्यानंतर खेळासाठी बंद होईल.
2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. यापूर्वी 1900 च्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. जर 2032 च्या ऑलिंपिकसाठीही क्रिकेट पात्र ठरले तर ग्रेट बॅरियर रीफ अरेना तसेच गाबा येथे सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत, गाबावरील ती शेवटची क्रिकेट स्पर्धा ठरेल.
गाबा हे ऑस्ट्रेलियातील सर्वात प्रतिष्ठित क्रिकेट मैदानांपैकी एक मानले जाते. 1895 मध्ये ते बांधले गेले. त्याची आसन क्षमता 37,000 आहे. येथे पहिला कसोटी सामना 1931 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. या मैदानावर अनेक ऐतिहासिक सामने खेळले गेले आहेत. येथे आतापर्यंत 67 पुरुष क्रिकेट सामने खेळले गेले आहेत. तसेच महिला संघाने दोन कसोटी सामने खेळले आहेत.
या मैदानावरील पहिला एकदिवसीय सामना 1979 मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात तर पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 2006 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला.