गाबा कसोटीत रोहित शर्मा सलामी देणार! ‘या’ 2 खेळाडूंना मिळणार डच्चू

Border Gavaskar Trophy : भारताचा संभाव्य संघ असा असेल
Border Gavaskar Trophy Gabba Test Team India
गाबा कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये 2 बदल होण्याची शक्यता आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 1-1 अशी बरोबरीत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना शनिवारपासून (14 डिसेंबर) ब्रिस्बेनमधील द गाबा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. पर्थमधील पहिली कसोटी जिंकल्यानंतर ॲडलेडमधील दुसऱ्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. अशा स्थितीत टीम इंडियाला गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणे गाबामध्ये चमकदार कामगिरी करण्यास सज्ज झाली आहे.

गाबा कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग 11 मध्ये 2 बदल होण्याची शक्यता आहे. याशिवाय रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीप्रमाणे गाबामध्ये 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 2 बदलांबद्दल बोलायचे झाल्यास, हर्षित राणा आणि रविचंद्रन अश्विन यांना डच्चू दिला जाऊ शकतो.

राहुलच्या जागी रोहित सलामी करू शकतो

पर्थ कसोटीत रोहित शर्माच्या गैरहजेरीत केएल राहुलने यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात केली. राहुलने चमकदार खेळ दाखवला. पहिल्या डावात त्याला 26 धावा करता आल्या होत्या मात्र दुसऱ्या डावात त्याने 77 धावा केल्या. यानंतर त्याने ऑस्ट्रेलिया पीएम इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यातही सलामी दिली. ॲडलेड कसोटीतही तो दोन्ही डावात सलामीला आला. मात्र, या सामन्यात राहुल फ्लॉप झाला. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माने मधल्या फळीत फलंदाजी केली. त्यानेही निराशा केली. आता गाबा कसोटीत राहुल मधल्या फळीत खेळणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे जैस्वालसोबत रोहित शर्मा डावाची सुरुवात करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गिलसमोर मोठ्या खेळीचे आव्हान

शुबमन गिलने दुखापतीतून परतल्यानंतर ॲडलेड कसोटीत चांगली फलंदाजी केली. तो फॉर्मात दिसत होता, पण चांगल्या सुरुवातीचे त्याला मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. गाबामध्ये त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. विराट कोहलीलाही आपली जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. पर्थमधील पहिल्या कसोटीत त्याने शतक झळकावले. दुसऱ्या कसोटीत तो फेल गेला. भारताला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकायची असेल तर विराट कोहलीने धावा करणे आवश्यक आहे.

पंत एक्स फॅक्टर ठरणार?

ऋषभ पंतने गाबा येथे गेल्या वेळच्या भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या सामन्यानंतर पंतला कसोटीत मॅचविनर ही उपाधी मिळाली. त्यामुळे मागिल अनुभव पाहता तो पुन्हा एक्स फॅक्टर ठरू शकतो. नितीश रेड्डीने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. त्याने चारही डावात धावा केल्या आहेत, पण गोलंदाज म्हणून त्याला अजूनही काम करण्याची गरज आहे, जेणेकरून ऑस्ट्रेलियासारख्या परिस्थितीत चौथ्या वेगवान गोलंदाजाचा विचार करता त्याच्याकडे आत्मविश्वासाने पाहिले जाऊ शकते.

जडेजा की सुंदर?

भारतीय संघ गोलंदाजीत 2 बदल करू शकतो. रविचंद्रन अश्विनच्या जागी रवींद्र जडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते. अश्विन दुसऱ्या कसोटीत विशेष काही करू शकला नाही. भारतीय संघाची फलंदाजी कमजोर दिसत आहे. अशा परिस्थितीत रवींद्र जडेजा परदेशात प्रभावी ठरू शकतो. वॉशिंग्टन सुंदर पर्थ कसोटीत खेळला आहे. त्याच्याकडे फलंदाजीची क्षमताही आहे.

हर्षितच्या जागी आकाशदीपला संधी?

वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर हर्षित राणाच्या जागी आकाशदीपला संधी मिळू शकते. हर्षित राणाने पहिल्या कसोटीत चांगली गोलंदाजी केली, पण दुसऱ्या कसोटीत तो प्रभावी दिसला नाही. तो गुलाबी चेंडूसह गोलंदाजीतील सर्वात कमकुवत दुवा असल्याचे दिसत होते. त्याच्या जागी आकाशदीपला संधी मिळू शकते. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज खेळणार हे निश्चित आहे.

भारताची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा/वॉशिंग्टन सुंदर, आकाशदीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news