

झुरिच : जगभरातील तमाम फुटबॉलप्रेमींना 11 जून 2026 पासून खेळवल्या जाणाऱ्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपचे आतापासूनच वेध लागले आहेत. या आगामी स्पर्धेचे आयोजन अमेरिका, मेक्सिको व कॅनडा यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे. अगदी दस्तुरखुद्द ‘फिफा’साठी देखील ही स्पर्धा अनन्यसाधारण महत्त्वाची असते. याचे कारण म्हणजे ‘फिफा’च्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोतदेखील या वर्ल्डकपच्या माध्यमातून होणारी कमाई हाच आहे.
केवळ ‘फिफा’च नव्हे, तर ‘फिफा’शी संलग्न असलेल्या 211 देशांंचीदेखील या वर्ल्डकपमुळे आर्थिकदृष्ट्या बल्ले बल्ले होणार आहे. एका अभ्यासानुसार, या आगामी फुटबॉल विश्वचषकातून ‘फिफा’ची कमाई थोडीथोडकी नव्हे, तर चक्क 9.96 लाख कोटींपर्यंत सहज होणार आहे.
जगभरात फुटबॉल जितके रुजले आहे, त्याचे ‘फिफा’कडून होणारी गुंतवणूक हे देखील मुख्य कारणांपैकी एक आहे. यापूर्वी ‘फिफा’ला जितके उत्पन्न मिळाले, त्याच्या 90 टक्के रक्कम त्यांनी फुटबॉलच्या विकासाचे प्रकल्प राबवण्यात खर्च केली आहे. याशिवाय, फिफा आपल्या संलग्न राष्ट्रांनादेखील मोठ्या प्रमाणात निधी देत असते. यानुसार, प्रत्येक सदस्य राष्ट्रेदेखील गर्भश्रीमंतीत लोळणारी ठरत आली आहेत.
4.34 लाख कोटी : प्रसारण अधिकार
2.80 लाख कोटी : प्रीमियम कॉर्पोरेट पॅकेज, तिकीट विक्री
2.44 लाख कोटी : स्पॉन्सरशिप व मार्केटिंग
यापूर्वीची 2022 मध्ये कतारच्या भूमीत खेळवली गेलेली फिफा वर्ल्डकप स्पर्धा कमालीची लोकप्रिय ठरली होती. त्यावेळी त्या स्पर्धेच्या माध्यमातून ‘फिफा’ची कमाई 27 बिलियन डॉलर इतकी झाली होती. मात्र, 2026 चा वर्ल्डकप मागील सर्व रेकॉर्डस् ब्रेक करत नवा उच्चांक प्रस्थापित करेल, हे एव्हाना सुस्पष्ट झाले आहे. मागील स्पर्धेच्या तुलनेत यंदाचा नफा 3.16 लाख कोटी रुपयांनी अधिक असेल, असे स्पष्ट संकेत आहेत.
2026 मधील स्पर्धेसाठी प्रारंभी ‘फिफा’ने जाहीर केलेले तिकिटांचे दर चढेच होते आणि यावरून प्रचंड टीकाही झाली. याची दखल घेत ‘फिफा’ने तिकिटांचे दर आपण कमी करत असल्याचे जाहीर केले. या स्पर्धेत एकूण 104 सामने खेळवले जाणार असून, या सर्व सामन्यांतील 10 टक्के तिकिटे 60 डॉलरना म्हणजे केवळ साडेपाच हजार रुपयांत उपलब्ध असतील, असा निर्णय ‘फिफा’ने घेतला. बाद फेरीसाठी मात्र वेगळा निकष लावण्यात आला असून, यानुसार जे संघ बाद फेरीत पोहोचतील, त्याच संघांच्या चाहत्यांना संबंधित लढतीत प्राधान्य दिले जाणार आहे.