

fifa world cup 2026 likely to be affected by rising global temperatures
पुढील वर्षी म्हणजे 2026 ला होणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेला वाढत्या जागतिक तापमानाचा फटका बसणार असल्याचे समोर आहे. या स्पर्धेचे आयोजन अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे संयुक्तरित्या करण्यात येणार असून संपूर्ण स्पर्धा कालावधीत प्रचंड उष्णतेचा तडाखा बसणार असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यांच्या मते, उत्तर गोलार्धातील तळपत्या उन्हाळ्यात अशा भव्य स्पर्धांचे आयोजन करणे म्हणजे धोक्यालाच आमंत्रण देण्यासारखे आहे.
अमेरिकेत नुकतीच फिफा क्लब विश्वचषक स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेदरम्यान तापमान वाढीची धोक्याची घंटा वाजवली आहे. ही केवळ एक झलक होती; खरी अग्निपरीक्षा तर 2026 च्या विश्वचषकात पाहायला मिळणार आहे, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, 1930 पासून विश्वचषक स्पर्धा जून आणि जुलै महिन्यात आयोजित केली जाते. तथापि, जागतिक स्तरावर या महिन्यांतील तापमानात 1.05 डिग्री सेल्सिअस (1.89 डिग्री फॅरेनहाइट) ने वाढ झाली आहे, तर युरोपातील उन्हाळ्यात, विशेषतः 1990 च्या दशकापासून, 1.81 डिग्री सेल्सिअसची अधिक तीव्र वाढ दिसून आली आहे.
प्रोफेसर पिअर्स फोर्स्टर यांनी गंभीर धोक्याची सूचना दिली आहे. त्यांच्या मते, आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. स्पर्धा हिवाळ्यात किंवा थंड प्रदेशात खेळवणे हाच एक उपाय आहे. अन्यथा, उष्णतेमुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याचा धोका अटळ आहे, असा इशारा दिला आहे. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधील हवामानशास्त्रज्ञ फ्रेडरिक ओटो यांनीही उष्माघात आणि तीव्र उष्णतेमुळे येणारा थकवा टाळण्यासाठी सामने सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा खेळवण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.
14 जून ते 13 जुलै दरम्यान 11 अमेरिकन शहरांमध्ये झालेल्या क्लब विश्वचषक स्पर्धेत अतिउष्णता आणि वादळी पावसाचा अनुभव आला. या स्पर्धेदरम्यान, फिफाने अतिरिक्त वॉटर ब्रेक, मैदानावर अधिक पाण्याची सोय आणि कुलिंग बेंच यांसारखे उपाय योजले असले तरी, चेल्सीचा खेळाडू एन्झो फर्नांडेझ याने भोवळ येत असल्याची तक्रार केली. तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी दुपारच्या वेळेतील सामने टाळण्याचे आवाहन फिफाला केले.
फिफप्रो (FIFPRO), जागतिक फुटबॉलपटूंच्या संघटनेने, पुढील वर्षीच्या विश्वचषकातील 16 पैकी सहा शहरांना उष्णतेच्या ताणाचा ‘अत्यंत उच्च धोका’ असल्याचे म्हटले आहे. यावर फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी दिवसा होणाऱ्या सामन्यांसाठी बंदिस्त स्टेडियमचा वापर केला जाईल, असे म्हटले आहे.
स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या 2030 च्या विश्वचषकात उष्णतेचे आव्हान अधिकच मोठे आहे. हे सामने जूनच्या मध्यापासून जुलैच्या मध्यापर्यंत अशा देशांमध्ये होणार आहेत, जिथे या उन्हाळ्यातच तापमान 40 डिग्री सेल्सिअस (100 डिग्री फॅरेनहाइट)च्या पुढे गेले आहे. तरीही, फिफाने या धोक्याला गांभीर्याने घेतलेले नाही. 2030 च्या यजमानपदासाठी मूल्यांकन करताना त्यांनी उष्णतेचा धोका कमी लेखला. फिफाने स्पष्ट म्हटले आहे की, यामुळे खेळाडू किंवा इतर सहभागींच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
कॅनबेरा विद्यापीठाचे ज्युलियन पेरियार्ड यांनी यातील गंभीर धोक्यांवर बोट ठेवले आहे. त्यांच्या मते, दिवसाच्या सर्वात उष्ण वेळी थेट सूर्यप्रकाशात 90 मिनिटे फुटबॉल खेळणे अत्यंत घातक ठरू शकते. यामुळे खेळाडूंना अनेक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यामध्ये हायपरथर्मिया (अतिउष्णता), हृदयावर अतिरिक्त ताण आणि स्नायूंमध्ये पेटके येणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे. हा त्रास इतका वाढू शकतो की, खेळाडूला तीव्र थकवा जाणवतो आणि प्रसंगी जीवघेणा उष्माघातही होऊ शकतो.
ऑलिम्पिक मॅरेथॉनसारख्या अनेक उन्हाळी क्रीडा स्पर्धांमध्ये तीव्र उष्णता टाळण्यासाठी सामन्यांची वेळ बदलली जाते, परंतु फुटबॉलमध्ये सकाळच्या वेळेत सामने होणे दुर्मिळ आहे. यामागे अनेकदा युरोपातील दूरचित्रवाणी प्रेक्षकांचा विचार असतो. 48 संघांच्या विस्तारित 2026 विश्वचषकामुळे व्यस्त वेळापत्रकामुळे फिफाला दिवसाचे सामने टाळणे कठीण होणार आहे.
उत्तर गोलार्धातील उन्हाळ्यात विश्वचषक आयोजित केल्यास उष्णतेची समस्या निर्माण होते. याच कारणामुळे कतारमधील 2022 चा विश्वचषक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खेळवण्यात आला. सौदी अरेबियातील 2034 च्या विश्वचषकासाठीही असाच बदल अपेक्षित आहे. मात्र, विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल करणे गुंतागुंतीचे आहे. यामुळे युरोपियन फुटबॉल लीगच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. यात देशांतर्गत आणि चॅम्पियन्स लीग स्पर्धांचा समावेश आहे. फिफाने 2030 आणि 2034 विश्वचषकाच्या तारखा बदलण्याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही.
वाढत्या जागतिक तापमानामुळे, मोठ्या मैदानी क्रीडा स्पर्धांचे आयोजन केव्हा आणि कुठे करावे, हा प्रश्न अधिकाधिक गंभीर बनणार आहे. सिडनी विद्यापीठाचे प्राध्यापक ओली जे यांच्या मते, 1990 च्या दशकाच्या तुलनेत 2023 मध्ये खेळाडू आणि सामान्य नागरिकांनाही 28 टक्के अधिक मध्यम किंवा उच्च उष्णतेच्या धोक्याचा सामना करावा लागला. पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ मायकल मान यांनी याला ‘एक मोठी समस्या’ म्हटले आहे. त्यांच्या मते, हवामान बदलामुळे आपल्या जीवनशैलीवर गंभीर परिणाम होत आहेत. हे बदल आपल्या नेहमीच्या जगण्यात मोठे अडथळे निर्माण करत आहेत.