FIFA World Cup Semi Final : फ्रान्‍स की स्‍पेन? कोणासाठी उघडणार फायनलचा दरवाजा? कट्टर प्रतिस्पर्ध्यांत रंगणार पहिली सेमीफायनल

france vs spain : फ्रान्स सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर
Fifa world cup semi final france vs spain
Published on
Updated on

Fifa world cup semi final france vs spain

डॅलस (टेक्सास) : फुटबॉल विश्वातील दोन सर्वात मोठे संघ फ्रान्स आणि स्पेन बुधवारी (दि. १५) फिफा विश्वचषक स्‍पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने येत आहेत. डॅलस येथील एटी अँड टी स्टेडियमवर होणारा एका अर्थाने युरोपियन फुटबॉलमधील वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.

स्पेनचा संघ सध्या प्रचंड फॉर्मात असून गेल्या ३६ सामन्यांत ते अपराजित आहेत. मार्च २०२४ नंतर त्यांनी एकाही सामन्यात पराभव पत्करलेला नाही. दुसरीकडे, फ्रान्स सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.

विशेष म्हणजे, फ्रान्सचा मागच्या वर्षभरातील एकमेव पराभव २०२५ च्या नेशन्स लीगमध्ये स्पेनविरुद्धच (५-४) झाला होता. त्यामुळे या सामन्यात जुना हिशेब चुकता करण्याची संधी फ्रान्सकडे असेल. फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर डेशॅम्प्स यांच्या मार्गदर्शनाखाली किलियन एम्बाप्पे आणि उस्मान डेम्बेले ही जोडी स्पेनचे संरक्षण भेदण्यासाठी सज्ज आहे.

एम्बाप्पेच्या घोट्याला किरकोळ दुखापत झाली असली, तरी तो या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार हे निश्चित मानले जात आहे. फ्रान्ससाठी १४ जुलै म्हणजेच ‘बॅस्टिल डे’ (राष्ट्रीय दिन) हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस असल्याने, खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणीत असेल.

दुसऱ्या बाजूला, विद्यमान युरोपीय विजेता स्पेन संघ आपली विजयाची मालिका कायम ठेवण्यास उत्सुक आहे. प्रशिक्षक लुईस डी ला फुएंटे यांच्या रणनीतीमुळे स्पेनने पोर्तुगाल आणि बेल्जियमसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केले आहे. मिकेल मेरिनो हा बदली खेळाडू म्हणून गोल करण्यात पटाईत ठरला असून, तरुण विंगर लॅमिन यमाल आणि मिकेल ओयारझाबाल यांच्यावर स्पेनच्या आक्रमणाची धुरा असेल.

इतिहास फ्रान्‍सच्‍या तर, वर्तमान स्‍पेनच्‍या बाजूने

इतिहास फ्रान्सच्या बाजूने असला, तरी सध्याचा फॉर्म पाहता वर्तमान स्पेनच्या बाजूने असेल. या महामुकाबल्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत इंग्लंड-अर्जेंटिना यांच्यातील विजेत्‍याशी जेतेपदासाठी दोन हात करेल.

या लढतीचे ‘खास’ वेगळेपण काय?

  • ३६ वर्षांनंतरचा ऐतिहासिक योगायोग : फिफा विश्वचषकाच्या इतिहासात तब्बल ३६ वर्षांनंतर (१९९० च्या विश्वचषकानंतर) पहिल्यांदाच जागतिक क्रमवारीतील अव्वल चार संघ (फ्रान्स, अर्जेंटिना, स्पेन आणि इंग्लंड) उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.

  • दिदिएर डेशचॅम्प्स यांचा ५० वर्षांचा महाविक्रम : फ्रान्सचे मुख्य प्रशिक्षक दिदिएर डेशचॅम्प्स या सामन्यात उतरताच विश्वचषकात सर्वाधिक २६ सामन्यांमध्ये संघ प्रशिक्षक असण्याचा ५० वर्षे जुना विक्रम मोडतील. ते जर्मनीच्या हेलमूट शॉन (२५ सामने) यांचा विक्रम मागे टाकतील.

  • स्पेनचे प्रशिक्षकही अपराजित : स्पेनचे मुख्य प्रशिक्षक लुईस डी ला फुएंटे यांच्या मार्गदर्शना खाली स्पेनने १३ मोठे आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यापैकी १२ सामने जिंकले आहेत तर १ सामना अनिर्णीत राहिला आहे. ते अद्याप एकही सामना हरलेले नाहीत.

  • बदली खेळाडूची जादू : स्पेनचा मिकेल मेरिनो हा विश्वचषक इतिहासातील पहिला असा खेळाडू ठरला आहे, ज्याने बदली खेळाडू म्हणून मैदानात येत सलग दोन बाद फेरीच्या सामन्यांमध्ये विजयी गोल केले आहेत.

  • एम्बाप्पे विरुद्ध यमाल जुगलबंदी : फ्रान्सचा ८ गोल करणारा गोल्डन बूटचा दावेदार किलियन एम्बाप्पे आणि स्पेनचा अवघ्या १८ वर्षांचा उदयोन्मुख तारा लॅमिन यमाल यांच्यातील थेट लढत ही या सामन्याचे सर्वात मोठे आकर्षण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news