FIFA World Cup Semi Final : ९०० बळी, ४४ वर्षांचे शत्रुत्व... इंग्लंड-अर्जेंटिनामध्ये पुन्हा भडकणार ९० मिनिटांचे सूडनाट्य

१६ जुलैला मैदानावर उडणार ठिणग्या; इंग्लंड-अर्जेंटिनाच्या सेमीफायनल लढतीचा रंगणार थरार
FIFA World Cup 2026 Argentina vs England second semifinal
Published on
Updated on

FIFA World Cup 2026 Argentina vs England second semifinal

फुटबॉल हा फक्त ९० मिनिटांचा खेळ आहे, असे तुम्हाला वाटत असेल, तर इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील ऐतिहासिक प्रतिस्पर्धा तुमचा हा समज एका क्षणात बदलून टाकेल. या दोन संघांमध्ये सामना रंगतो, तेव्हा मैदानावर केवळ २२ खेळाडूच उतरलेले नसतात; त्यांच्यासोबत धावत असतो १९८२ च्या फॉकलंड युद्धाचा इतिहास, १९८६ विश्वचषकातील डिएगो मॅराडोनाचा वादग्रस्त 'हँड ऑफ गॉड' गोल आणि १९९८ मध्ये डेव्हिड बेकहॅमला मिळालेले रेड कार्ड. त्यामुळे इंग्लंड विरुद्ध अर्जेंटिना हा सामना केवळ फुटबॉलपुरता मर्यादित राहत नाही, तर तो इतिहास, भावना, अभिमान आणि कट्टर प्रतिस्पर्धेचा थरारक संग्राम बनतो.

फीफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये १६ जुलै रोजी इंग्लंड आणि अर्जेंटिना पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. हा सामना केवळ अंतिम फेरीच्या तिकिटासाठीचा नसून, चार दशकांहून अधिक काळाच्या ऐतिहासिक वैराची नवी लढाई असेल. या कट्टर प्रतिस्पर्ध्यांची कहाणी समजून घ्यायची असेल, तर आपल्याला थेट ४४ वर्षे मागे १९८२ मधील घटनांकडे वळावे लागेल.

१९८२ चे 'फोकलंड युद्ध'

इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील फुटबॉल सामन्यांना केवळ एका खेळाचे स्वरूप नसते, तर त्यामागे दोन देशांमधील जुना राजकीय संघर्ष आणि युद्धाचा इतिहास आहे. या कट्टर शत्रुत्वाची मुळे दक्षिण अटलांटिक महासागरातील 'फोकलंड बेट' वादात रुजलेली आहेत. अर्जेंटिना या बेटाला आपलाच भाग असल्याचा दावा करत होता, तर ब्रिटनचा (इंग्लंड) या बेटावर १८३३ पासूनच ताबा होता.

युद्धाची ठिणगी (१९८२ चा संघर्ष)

अर्जेंटिनाचा अचानक हल्ला (२ एप्रिल १९८२) : अर्जेंटिनामध्ये त्यावेळी लष्करी राजवट होती. देशांतर्गत आर्थिक आणि राजकीय संकटांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी तेथील लष्करी राजवटीने अचानक फोकलंड बेटावर हल्ला केला आणि ब्रिटिश गव्हर्नरला शरण येण्यास भाग पाडले.

ब्रिटनचे आक्रमक प्रत्युत्तर : ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर (ज्यांना 'आयर्न लेडी' म्हणून ओळखले जाते) यांनी या आक्रमणाला चोख उत्तर देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोणतीही तडजोड न करता ब्रिटिश नौदल आणि वायूदलाची एक मोठी 'टास्क फोर्स' फोकलंडकडे रवाना केली.

युद्धाचा थरार आणि परिणाम

हे युद्ध दक्षिण अटलांटिक महासागरातील अत्यंत प्रतिकूल हवामानात, कडाक्याच्या थंडीत लढले गेले. दोन्ही देशांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. तब्बल ७४ दिवस चाललेल्या या युद्धात अर्जेंटिनाचे ६४९ आणि ब्रिटनचे २५५ सैनिक मारले गेले, तर ३ स्थानिक नागरिकही मरण पावले.

ब्रिटनचा विजय (१४ जून १९८२) : ब्रिटिश सैन्याने कौशल्याच्या आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर अर्जेंटिनाच्या सैन्याला चहूबाजूंनी घेरले. अखेर अर्जेंटिनाच्या सैन्याने शरणागती पत्करली आणि ब्रिटनने बेटावर पुन्हा आपले नियंत्रण मिळवले.

युद्धाचे राजकीय व सामाजिक पडसाद

या युद्धाच्या परिणामाने दोन्ही देशांचे राजकारण कायमचे बदलून टाकले. लाजिरवाण्या पराभवामुळे अर्जेंटिनातील लष्करी हुकूमशाही कोसळली आणि तिथे पुन्हा लोकशाहीची स्थापना झाली. परंतु, जनतेच्या मनात आपला स्वाभिमान आणि भूमी हिरावून घेतल्याची खोल जखम आणि राग कायम राहिला. तर ब्रिटनमध्ये पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली आणि त्यांनी पुढील निवडणुका प्रचंड बहुमताने जिंकल्या.

युद्ध संपले, पण अर्जेंटिनाच्या जनतेच्या मनातील पराभवाची जखम आणि स्वाभिमानाला बसलेला धक्का कायम राहिला. याच वेदनेचा आणि बदल्याच्या भावनेचा उद्रेक अवघ्या चार वर्षांनी, १९८६ च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फुटबॉलच्या मैदानावर झाला.

२२ जून १९८६ : मॅराडोनाचा तो '१० मिनिटांचा' चमत्कार

मेक्सिको सिटीचे अझ्टेका स्टेडियम आणि तब्बल १ लाख १५ हजार प्रेक्षक! १९८६ च्या विश्वचषकातील हा क्वार्टर फायनल सामना होता. पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघ सावध खेळत होते. मैदानातील ताण स्पष्ट जाणवत होता. पण दुसऱ्या हाफमधील १० मिनिटांनी फुटबॉलचा इतिहास कायमचा बदलून टाकला.

'हँड ऑफ गॉड' (Hand of God)

सामन्याच्या ५१ व्या मिनिटाला अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू दिएगो मॅराडोना इंग्लंडच्या बॉक्सकडे धावला. इंग्लंडच्या डिफेंडरने चेंडू क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत उडाला. इंग्लंडचा गोलकीपर पीटर शिल्टन चेंडू पकडण्यासाठी हवेत झेपावला, त्याच वेळी मॅराडोनानेही उडी मारली. शिल्टनच्या हाताआधी मॅराडोनाचा हात चेंडूला लागला आणि चेंडू थेट गोलपोस्टच्या आत गेला.

त्या काळात 'VAR' (Video Assistant Referee) किंवा कोणतीही आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली नव्हती. रेफरीने आपल्या असिस्टंटकडे पाहिले, ध्वज उंचावला गेला नाही आणि गोल दिला गेला. इंग्लंडचे खेळाडू हा 'हँडबॉल' असल्याचे ओरडून सांगत होते, पण निर्णय बदलला नाही. सामन्यानंतर जेव्हा मॅराडोनाला विचारण्यात आले, तेव्हा ते हसून म्हणाला, ‘‘हा गोल थोडा माझ्या डोक्याने आणि थोडा 'देवाच्या हाताने' झाला आहे.’’

'गोल ऑफ द सेंचुरी' (Goal of the Century)

या वादाला अवघी ४ मिनिटे झाली नव्हती तोच, ५५ व्या मिनिटाला मॅराडोनाने आपल्या हाफमधून चेंडू घेतला. त्याने इंग्लंडच्या एक-दोन नव्हे तर तब्बल ५ खेळाडूंना आणि गोलकीपर पीटर शिल्टनला चकवून सुमारे ६० मीटर धावत अप्रतिम गोल केला. २००२ मध्ये फिफाने ऑनलाईन पोल घेतला, ज्यामध्ये या गोलला अधिकृतपणे 'गोल ऑफ द सेंचुरी' म्हणून घोषित करण्यात आले. एकाच सामन्यात जगातील सर्वात वादग्रस्त आणि जगातील सर्वात महान गोल करणारा मॅराडोना हा एकमेव जादूगार होता. हा सामना अर्जेंटिनाने २-१ ने जिंकला आणि पुढे जाऊन विश्वविजेतेपदही पटकावले.

१९९८ चा वर्ल्ड कप: बेकहॅमचा 'व्हिलन' ते 'हिरो' प्रवास

काळ बदलला, नवी पिढी आली, पण जुने शत्रुत्व कायम होते. १९९८ च्या वर्ल्ड कपमध्ये हे दोन संघ पुन्हा भिडले. दुसऱ्या हाफमध्ये इंग्लंडचा युवा स्टार डेव्हिड बेकहॅम आणि अर्जेंटिनाचा दिएगो सिमिओन यांच्यात टक्कर झाली. मैदानात पडलेल्या बेकहॅमने रागाच्या भरात सिमिओनला पाय मारला. रेफरीने थेट बेकहॅमलाल 'रेड कार्ड' दाखवून मैदानाबाहेर काढले. १० खेळाडूंसह खेळणारा इंग्लंड हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये हरला.

या पराभवानतंर ब्रिटिश माध्यमांनी आणि चाहत्यांनी बेकहॅमवर टीकेची झोड उठवली. चाहत्यांनी त्याचे पुतळे जाळले, त्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या.

२००२ मध्ये ऐतिहासिक कमबॅक

४ वर्षांनी, म्हणजेच २००२ च्या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा हेच दोन संघ आमने-सामने आले. सामन्यात इंग्लंडला पेनल्टी मिळाली आणि चेंडूच्या मागे उभा होता तोच डेव्हिड बेकहॅम! संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला होता. बेकहॅमने कोणतीही चूक न करता अप्रतिम गोल केला आणि इंग्लंडला १-० ने विजय मिळवून दिला. हा गोल बेकहॅमसाठी केवळ एक विजय नव्हता, तर ऐतिहासिक 'कमबॅक ठरले.

महामुकाबला २०२६: इतिहास पुन्हा जागा होणार?

मॅराडोना आज आपल्यात नाही. बेकहॅम आणि पीटर शिल्टनही आता मैदानावर दिसत नाहीत. मात्र त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी आणि इतिहास आजही इंग्लंड व अर्जेंटिना या दोन्ही संघांच्या प्रत्येक लढतीत जिवंत होतात.

इंग्लंडसमोर ४० वर्षांहून अधिक काळापासूनची कटू आठवण पुसत नव्या पिढीसह इतिहास घडवण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे, अर्जेंटिना मॅराडोनाच्या वारशाला न्याय देत आणखी एका ऐतिहासिक विजयाची नोंद करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

त्यामुळे १६ जुलै रोजी होणारा हा सेमीफायनलचा केवळ ९० मिनिटांचा फुटबॉल सामना नसेल, तर दोन देशांचा स्वाभिमान, चार दशकांची कट्टर प्रतिस्पर्धा आणि इतिहासाचा वारसा पणाला लागलेली लढाई असेल. जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या नजरा या महासंग्रामावर खिळल्या असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news