

पाम बीच : फुटबॉल वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिटांसाठी जगभरातून मोठ्या प्रमाणात विनंती अर्ज येत आहेत. स्पर्धेआधीच सर्व सामन्यांची तिकिटे विकली गेलेली असतील, सर्व 104 सामने हाऊसफुल्ल होतील, असा विश्वास ‘फिफा’चे अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांमध्ये संयुक्तपणे 11 जून ते 19 जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या या स्पर्धेसाठी फुटबॉलप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
इन्फँटिनो यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सुमारे 70 लाख तिकिटांसाठी गेल्या चार आठवड्यांत 200 हून अधिक देशांतून तब्बल 50 कोटी 80 लाख (508 दशलक्ष) तिकिटांच्या विनंत्या आल्या आहेत. असा प्रचंड प्रतिसाद याआधी आम्ही कधीही पाहिलेला नाही, हे खरोखरच अविश्वसनीय आहे.
स्पर्धेचा कालावधी : 11 जून ते 19 जुलै 2026.
यजमान शहरे : अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडातील 16 शहरांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल.
अंतिम सामना : न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे.
तिकिटांच्या किमतींवरून सध्या वाद सुरू आहे. अधिकृतरीत्या 60 डॉलर्सपासून (सुमारे 5,000 रुपये) तिकीट उपलब्ध असले, तरी रिसेल मार्केटमध्ये फायनलच्या एका तिकिटाची किंमत 1.43 लाख डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. ‘फिफा’ने सपोर्टर एंट्री टायर अंतर्गत 60 डॉलर्सची तिकिटे राखीव ठेवली आहेत, जी संबंधित देशांच्या फुटबॉल महासंघांमार्फत खऱ्या चाहत्यांना उपलब्ध करून दिली जातील.
‘फिफा’ने सपोर्टर एंट्री टायर अंतर्गत 60 डॉलर्सची तिकिटे राखीव ठेवली आहेत, जी संबंधित देशांच्या फुटबॉल महासंघांमार्फत खऱ्या चाहत्यांना उपलब्ध करून दिली जातील.
या फुटबॉल वर्ल्डकपमधून ‘फिफा’ला 11 अब्ज डॉलर्सचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनातून सुमारे 30 अब्ज डॉलर्सचा फायदा होईल आणि 1.85 लाख पूर्णवेळ नोकऱ्या निर्माण होतील, असा अंदाज आहे.